कवितेने बालमनावर केलेले सुसंस्कार दिर्घकाळापर्यंत टिकतात-कवी रविराज सोनार

पंढरपूर (प्रतिनिधी)-

चांगल्या बालकविता वाचून बाल मनावर चांगले संस्कार होतात आणि उत्तमोत्तम बाल कवितांमुळे बाल – मनावर झालेले सुसंस्कार हे दीर्घकाळापर्यंत टिकतात’’ असे मत येथील कवी
रविराज सोनार यांनी व्यक्त केले.  ते येथील सौ.पुष्पावती शिवदास भिंगे यांच्या संस्काराचे मोती’ या किशोरवयीन मुलांसाठी असणारा सचित्र काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कवी अथवा कवयित्री ज्या वयाचे आहेत त्या वयाच्या साहित्य रसिकांसाठी कविता लिहिणे तितकेसे अवघड नसते. परंतू साठी ओलांडलेल्या कवी किंवा कवयित्रीस बालवयीन मुलांसाठी  कविता लिहिताना बाल वयातील मुलांच्या मनाचा, प्रतिमांचा, उपमांचा आणि विषयांच्या विचार करूनच काव्यरचना करावी लागते आणि ते निश्‍चितच अवघड आहे.’’

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री.प्र.द.निकते सर म्हणाले की, संस्काराचे मोती’’ या कविता संग्रहामध्ये नानाविध विषयांवरच्या काव्यरचना असून प्रत्येक कवितेमध्ये प्रासाद, माधुर्य आणि ओज तर आहेच शिवाय त्यास सुसंस्काराची जोड आहे. प्रत्येक कुटूंबातील मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी संस्कार मोती’’ हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.’’

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने बोलताना कवयित्री सौ.पुष्पावती भिंगे म्हणाल्या, सेवा निवृत्तीनंतरच्या काळात भरपूर वाचन केले आणि बाल मनावर विशेषत: किशोरवयीन मुलांवर सुसंस्कार करणार्‍या कवितांच्या रचना करून संस्काराच्या मोत्यांची माळ पुस्तक  रूपात गुंफली आहे.’’

काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाचे औचित्य साधून काही निमंत्रित कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यामध्ये कवी राजेंद्र झुंबर भोसले, कवी दादासाहेब खरात, कवी रावसाहेब साठे, कवी गणेश गायकवाड आणि वैभव कुलकर्णी यांचे सुश्राव्य काव्यवाचन व गायन झाले. तर मानसीताई केसकर, हिराबाई स्वामी, प्रा.नागीन लोंढे, बाबुराव पटणे, शोभाताई कराळे यांची
शुभेच्छापर भाषणे झाली. प्रकाशन समारंभ प्रसंगी सौ.सुलभाताई होनराव, डॉ.नंदकुमार होनराव, डॉ.प्रियाताई भिंगे, डॉ.आनंद भिंगे यांनी सर्व मान्यवर व साहित्य रसिकांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिन लादे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार डॉ. प्रियाताई भिंगे यांनी मानले. सदर प्रकाशन सोहळ्यास पंढरपूर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर साहित्यरसिक उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *