श्री नृसिंह सरस्वती हे दत्ताचे दुसरे अवतार होत. ज्या वेळी धर्माला ग्लानि येते आणि लोक नीतिनियमांना विसरून अनीतीने वागू लागतात, त्या त्या वेळी ती परिस्थिति पालटण्यासाठी केवळ संत महात्म्यांचे प्रयत्न अपुरे पडतात. अशावेळी मानवकल्याणाकरता भगवंताला मानवाचे रूप घेऊन भूतलावर प्रगटावे लागते. यालाच ‘अवतार’ असे म्हणतात.
श्री नृसिंह सरस्वती यांचे मूळ नाव नरहरी असे होते. त्यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील कारंजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधव व आईचे अंबाभवानी असे होते. नरहरीची मुंज होईपर्यंत ते फक्त ॐचाच उच्चार करीत होते. मात्र गायत्री मंत्राची विधीपूर्वक दीक्षा मिळताच त्यांच्या वाणीला धार आली. चारही वेदांतील सुरूवातीच्या मंत्रांनी त्यांनी भिक्षा स्वीकारली. हे पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व विद्वान-पंडित नतमस्तक झाले.
वयाच्या आठव्या वर्षी ‘संन्यास’ घेऊन लोकोद्धार करण्यासाठी आईवडिलांचा निरोप घेऊन नरहरी तीर्थयात्रेस गेले. प्रथम ते काशी येथे आले. दृढ निश्चय आणि आंतरिक प्रेरणा यांमुळे कारंजापासून काशीपर्यंतची प्रदीर्घ वाटचाल आठ वर्षांच्या मुलाने सहजपणे केली ! तेथे येणारे श्री कृष्ण सरस्वती नरहरीच्या एकंदर कार्यक्रमाचे बारकाईने निरीक्षण करत. ते विद्वान आणि अनुभवी संन्यासी होते. नरहरीनेही त्यांची योग्यता ओळखली होती. श्री कृष्ण सरस्वती यांनी या तेजस्वी मुलाला संन्यास दीक्षा दिली आणि त्यांचे नाव ‘श्री नृसिंह सरस्वती’ असे ठेवले. वयाने लहान असले तरी अंगभूत गुणांनी त्यांच्या ठिकाणी लोकांचा आदर दुणावत गेला. ज्ञानदेवांप्रमाणे समाजहितदक्ष श्री नृसिंह सरस्वती यांनी चौदाव्या-पंधराव्या शतकात समाजात एकी निर्माण करण्याचे, स्वधर्म-निष्ठा जोपासण्याचे, मतभेद संपवण्याचे आणि सामाजिक जागृति निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
‘गुरुचरित्र’ या सुप्रसिद्ध ग्रंथातील चरित्रनायक श्री नृसिंह सरस्वतीच होत.दत्तोपासनेचे एक महान संजीवक आणि दत्तसंप्रदायाचे महान प्रवर्तक श्री नृसिंह सरस्वतीच आहेत. महाराष्ट्रात दत्तसंप्रदायाचा प्रारंभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या अवतार कार्यात झाला. औदुंबर, नृसिंहवाडी आणि गाणगापूर ही त्यांच्या प्रदीर्घ वासामुळे दत्तक्षेत्रे म्हणून उदयास आली.
संकलक : श्री चंद्रशेखर तांदळे
संपर्क क्र. : ८१४९९८७८१८

