म्हाळुंगेत मजूर आणि चोरट्यांच्या झटापटीत एका चोराचा मृत्यू
हिंजवडी (बाबाजी पवळे) – लोखंड चोरायला आलेले तीन चोरटे आणि मजुरांमध्ये झालेल्या मारहाणीत एका चोराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास म्हाळुंगे येथील पी.वाय.टी.सी महाविद्यालय येथे घडली.
किना चेडाना तिरके (रा. शंकर पुल, चाऊन गंगापूर, पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे. तर मजूर ठाकुर सिंग धारु (वय २७), सहदेवसिंग माधव सिंग (वय ३३, दोघे रा. झारखंड) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह राजकुमार सिंग, मनोज सिंग या चौघांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलिडे इन हॉटेलच्या मागील बाजूला पी.वाय.टी.सी महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्याच्या बाजूला मजुरांची वसाहत आहे. मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास किना त्याच्या दोन साथीदारांसह मजुरांच्या वस्तीत लोखंड, भंगार चोरायला गेला होता. त्यावेळी किनाच्या साथीदाराने दोन मजुरांना लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. याला मजुरांनीही प्रतिकार केला. या मारहाणीत किनाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे दोन साथीदार फरार झाले.
हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
