श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळयाच्या सोयी-सुविधांकडे सोलापूर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

पंढरपूर (भगवान वानखेडे):-

 श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पंढरपूर पर्यंतच्या विविध ठिकाणच्या मुक्कामी गावात व पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात पालखी सोहळ्यातील लाखो वारकर्‍यांच्या सोयी-सुविधांकडे सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा खळबळजनक खुलासा अखिल भारतीय वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन सातपुते यांनी दैनिक दामाजी एक्सप्रेसकडे व्यक्त केला. आषाढी वारीनिमित्त पंढरीत आलेले असताना त्यांनी आवर्जुन पंढरपूर च्या दैनिक दामाजी एक्सप्रेस कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी वारकर्‍यांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा, श्रीसंत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा, श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा, श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा, श्रीसंत सोपानकाका महाराज पालखी सोहळा या पाच पालख्या गॅझेटेड आहेत. या पालख्यांच्या प्रस्थानाचे ठिकाणाहून पंढरीपर्यंतच्या मार्गावर मुक्कामाच्या विविध ठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात. पालख्यांसोबत संरक्षणार्थ पोलिसांचा ङ्गौजङ्गाटा असतो. या गॅझेटेड असणार्‍या पाच पालख्यांंमध्ये प्रथम क्रमांक हा श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आहे. परंतु इतर पालख्यांना मिळणार्‍या सोयी-सुविधांच्या तुलनेत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातील सोयी-सुविधा ङ्गारच नगण्य असल्याने या पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे मत नितीन सातपुते यांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाचे ठिकाण त्र्यंबकेश्‍वर तेच पंढरी पर्यंतच्या प्रवासात मोजकेच पोलिस असणारी तोकडी संरक्षण यंत्रणा असते. पिण्याच्या पाण्याचे टँकर, आरोग्य सेवा पथक आदी सुविधा अपुर्‍या असतात. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर, जि.नाशिक येथून आषाढ शु. 15 ला या पालखी सोहळयाचे प्रस्थान होते. त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूर हा जातानाचा 26 दिवसांचा प्रवास असतो तर परतीचा प्रवास हा 18 दिवसांचा असतो. या प्रवासादरम्यान पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या तब्बल सव्वा लाख वारकर्‍यांच्या व पालखीच्या संरक्षणासाठी ङ्गक्त 5 ते 7 पोलिस या पालखी सोहळ्यासोबत असतात. यावर्षीपासून पालखी सोहळ्यातील रथ चांदीचा बनविलेला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने पोलिसांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. इतर पालख्यांच्या सोलापूर जिल्ह्यातील आगमनानंतर स्वागतासाठी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक आदी अधिकारी समक्ष हजर असतात; परंतु निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचे स्वागतास एकही अधिकारी हजर नसतो. सोलापूर जिल्ह्यातील पालखी सोहळ्याचे प्रवासात करमाळा तालुक्यातील रावगाव, जेऊर, शेलगाव वांगी, कंदर, टेंभुर्णी, दगडी अकोला, परीते आदी गावांत मुक्कामाची ठिकाणे आहेत तर पंढरपूर तालुक्यातील करकंब, पांढरेवाडी, चिंचोली भोसे, इसबावी आदी मुक्कामाची गावे आहेत. या सर्व मुक्कामांच्या ठिकाणी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांना पुरेशा सोयी-सुविधा मिळत नाहीत. शासनाचा भरमसाठ निधी या सर्व गावांना येतो मात्र त्याचा विनीयोग सुलभ शौचालय, पिण्याचे पाण्याचे पॉईंट वगैरेंसाठी केला जात नाही. परिणामी पालखी सोहळ्यातील वारकर्‍यांचे हाल होतात.

वारकर्‍यांच्या सोयी-सुविधेसाठी शासनाकडून मिळणार्‍या निधीचा विनीयोग योग्य त्या कामासाठी करुन ती कामे दर्जेदार पध्दतीची होणेसाठी संबंधीत प्रशासकीय अधिकार्‍यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसून येत नाही. याबाबत योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत तर आषाढी वारीनंतर अखिल भारतीय वारकरी सेनेच्या वतीने याविरुध्द लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असेही ते म्हणाले. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या वतीने विभाग प्रमुख भगवान वानखेडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सागर कदम, धनंजय आण्णा लटके, निलेश गंगथडे आदी उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *