पंढरपूर (प्रतिनिधी) – कोपर्डी येथील इयत्ता 9 वी मध्ये शिक्षण घेणार्या व राज्य पातळीवरील शालेय कबड्डी मध्ये नांवलौकीक प्राप्त केलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर पाशवीपणे अमानवीय अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला. या घटनेचा निषेध म्हणून आज ‘पंढरपूर बंद’ ची हाक येथील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी दिली आहे.
कोपर्डी येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून निंदनीय आहे. हे दुष्कृत्य करणार्या आरोपींना तात्काळ अटक करावी, निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकरणानंतर बलात्कार कायद्यामध्ये जो बदल केला त्यानुसार या प्रकरणातही जलद गतीने तपास होऊन कार्यवाही व्हावी, सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन त्या आरोपींना फाशी ची शिक्षा मिळावी. आदी मागण्या विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या आहेत.
या घटनेचा निषेध व्यक्त करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य असून माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर मधील व्यापार्यांनी दि. 21 जुलै 2016 रोजी आपापली दुकाने बंद ठेवून पंढरपूर बंद ला प्रतिसाद द्यावा असे आवाहन विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केले आहे.

