….गणेशोत्सवाच्या दहा दिवसात ऑर्केस्ट्रा , नाटकं आणि सिनेमे यांची रेलचेल असायची . मेळ्यांचा काळ मी बघितला नाही पण लहानपणी पंढरपुरात गणेशोत्सव काळात रंगणाऱ्या मेळ्याची चर्चा घरी दारी सुरु असायची . मेळे म्हणजे गायन , वादन , नाच , नाटके , नकला अश्या सर्व कलाप्रकारांचे एकत्रित सादरीकरण असायचं. .बाबुराव अन्नदाते , राजाभाऊ मंगळवेढेकर , अंबिके पेंटर ,अर्जुन पेंटर, वसंतराव बडवे , शंकर वनारे अश्या मंडळींनी हे मेळे बसवून पंढरपूरच्या गणेशोत्सवात धमाल उडवून दिली . नामांकितांबरोबरच नवोदितांनाही या मेळ्या मधून आपापले कला प्रकार सादर करायला मिळायचे . मराठी चित्रपट सृष्टीतील कितीतरी नामांकीतांनी पंढरपूरच्या या मेळ्यातून हजेरी लावल्याच्या आठवणी जुने जाणकार सांगतात . गणेशोत्सवाचे १० दिवस ह्या मेळ्यासाठी चौका चौकात प्रेक्षकांची झुंबड उडायची असे सांगतात . एकेका दिवसात ३ ते ४ प्रयोग केल्याच्या आठवणीही जाणकार सांगतात . ” गणेश उत्सव आला आला , गंमत वाटे मला ” अशी गाणी त्यावेळी मेळ्यानमधून गाजल्याचे जाणकार सांगतात . दिलीप टोमके , विजया बडवे असे बाल कलाकार या मेळयातूनच चमकले . दिलीप टोमके हे तर पुढे रेडीओ स्टार म्हणून नामांकित झाले . १९५६ च्या महापूर नंतर हे मेळे बंद पडल्याचे सांगतात ..
.पंढरपूरच्या नाट्यवेड्या कलाकारांनी बसवलेली नाटके हाही पंढरपूरच्या आकर्षणाचा भाग असायचा . श्री विनय महाराज बडवे आणि काही मंडळी जोमाने नाटके बसवायची आणि गणेशोत्सवात त्यांचे धूम धडाक्यात प्रयोग व्हायचे . ‘ नटसम्राट’ , ‘ चांदणे शिंपित जा’ , ‘ गुड बाय डॉक्टर ‘ , ‘ कवडी चुंबक’ ,’ प्रेमा तुझा रंग कसा ? ‘ , ‘ घरात फुलला पारिजात’ , ‘ तीन चोक तेरा’ , ‘ दिवा जाळू दे सारी रात ‘ , ‘ तरुण तुर्क , म्हातारे अर्क ‘ अशी कौटुंबिक नाटकं गणेशोत्सवात सादर व्हायची. (माझ्या सौभाग्यवतीनं यातल्या कित्येक नाटकातून भूमिका केल्या आहेत .) त्याच बरोब्बर जालिंदर वाडेगावकर , मधुकर टोमके , मोहन काळे , शिवाजी सागर , ज्ञानोबा शिंदे यांची ग्रामीण ढंगाची अस्सल गावरान नाटकेही गर्दी खेचायची . दसरा उजाडला ,फकिरा , जय मल्हार , टिळा लावते मी रक्ताचा अशी ग्रामीण ढंगाची नाटके बघण्यासाठी पंढरपूरकर वेडे व्हायचे . अनेक ज्ञात अज्ञात मंडळीचा पंढरीच्या नाट्य चळवळीत मोलाचा वाटा आहे.
..वग सम्राट सुप्रसिद्ध विनोदवीर प्रेम कुमार भोसले यांना कोण विसरेल ? गणेशोत्सवाच्या नाटकांना खरा रंग भरला तो यांनी , पंढरपूरचे मार्मिक लेखक प्रशांत गळीतकर यांची टोपी रोख डोकं उधार , डॉक्टर बिघडला दवाखाना उघडला , कश्यात काय लफड्यात पाय अशी फार्सिकल नाटके प्रेम कुमार भोसले यांनी बसवली आणि पंढरपूरकर जनतेला खळखळून हसवले , काळू बाळू यांच्या लोकनाट्यातहि प्रेम कुमार यांनी काम केले होते . त्यांची मेळ्यां मधली कामे बघून त्यांना मराठी चित्रपटातहि कामे मिळाली . (आणखी बरीच नावे राहून गेली आहेत त्याबद्दल क्षमस्व .)
..पंढरपूरच्या मंडळींची नाट्य चळवळ थंडावल्या नंतर कोल्हापूर , सांगली अश्या भागातल्या मंडळींची कलापथके , ओर्केष्ट्रा पंढरपुरात यायला लागले . आम्हा महाविद्यालयीन तरुणांसाठी हे आकर्षण असायचं . रात्री जेवण वगैरे उरकून हि कला पथके बघायला आम्ही मित्र मित्र जायचो . ……………………………………………..गल्ली बोळातून किंवा चौका चौकातून फुकट दाखविले जाणारे चित्रपट हाही पंढरपूरच्या गणेशोत्सवातला आकर्षणाचा भाग असायचा . चौकात किंवा गल्लीत पडदा लाऊन प्रोजेक्टर वर चित्रपट दाखवले जायचे . मुख्यता मराठी कौटुंबिक चित्रपटच दाखवले जायचे कारण त्या त्या भागातला स्त्री वर्ग मोठ्या प्रमाणावर चित्रपट बघण्यासाठी गोळा झालेला असायचा . साधी माणसं , मोहित्यांची मंजुळा , चोरीचा मामला , सोंगाड्या असे कितीतरी गाजलेले चित्रपट गणेशोत्सवाच्या काळात असे फुकट पडद्यावर बघायला मिळायचे . तेंव्हा टि. व्ही वगैरे नसल्याने ह्याचे खूपच अप्रूप वाटायचे . लोक घरून चटया वगैरे घेऊन यायचे आणि जागा धरून सिनेमा कधी सुरु होतोय याची वाट बघायचे . ………………………………….गणेशोत्सवाचे हे १० दिवस कलाकार आणि त्यांच्या कला यांना झळाळी आणून देणारे असायचे .
रम्य ते दिवस , रम्य त्या आठवणी आणि रम्य तो गणेशोत्सव. ………………………………………..श्याम सावजी …….पंढरपूर
Posted inPandharpur Live News




