दसर्यानिमित्त पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. काल आणि आज चंद्रभागेचे वाळवंटासह पंढरी नगरीत वैष्णवांचा मेळा भरलेला आढळून येत होता. काल श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दसर्यानिमित्त रविवारी रथ मिरवणूक काढण्यात आली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने रथ, दिंडी व पालखी मिरवणूक काढून दसरा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या दोन्ही दिवसांचे औचित्याने अवघी पंढरी विठुनामाच्या जयघोषाने व टाळमृदंगाच्या निनादाने दुमदुमली होती.
विजयादशमी अर्थात दसर्यानिमित्त विठ्ठल व रुक्मिणीमातेस रेशमी वस्त्र व विविध अलंकारांच्या पोशाखाने सजविण्यात आले होते. सकाळी महानैवेद्य दाखविण्यात आला. सायंकाळी 7 वाजता पांडुरंगाच्या रथाचे पूजन मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रथामध्ये ठेवलेल्या पांडुरंगाच्या पादुका आणि दिंडी मिरवणुकीस प्रारंभ झाला. रथ व दिंडी नामदेव पायरीपासून सिमोल्लंघनासाठी रिद्धी-सिद्धी गणपतीपर्यंत नेण्यात आला. हा रथ भाविक हाताने ओढत होते. यावेळी भाविक टाळ, मृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनामाचा जयघोष करीत सहभागी झाले होते. रथासमोर शोभेचे दारुकाम करण्यात येत होते. हा रथ रिद्धी-सिद्धी गणपती मंदिरापासून निघून नगरप्रदक्षिणा करून पुन्हा नामदेव पायरीजवळच विसर्जन करण्यात आला. त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीमध्ये विठ्ठलाच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या. ही पालखी नगरप्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिरात आली. पालखीसमोरही दिंडीसह मंदिर समितीच्या कर्मचार्यांसह बहुसंख्य भाविक सहभागी झाले होते.
आज बुधवारी पाशांकुशा एकादशी असल्याने दुपारनंतर भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेले वारकरी व दिंड्या टाळ, मृदुंगात तल्लीन होऊन नाचत बागडत होते. महिला वारकरी फुगडीचा आनंद घेत होत्या. पददर्शनाबरोबरच मुख दर्शन, नामदेव पायरी दर्शन घेण्यासाठी महाद्वार चौकापर्यंत वारकर्यांची गर्दी झाली होती.
मंदिर समितीचे ढिसाळ नियोजन- विठ्ठल भक्तांची हेळसांडकाल दसर्यानिमित्त व आज बुधवारी पाशांकुशा एकादशी असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागातून मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्त पंढरीच्या राजाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे होते. परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेच्या बाबतीत ढिसाळ नियोजन झाल्याचे दिसून येत होते. भाविकांमध्ये चेंगराचेंगरीचे प्रकार कांही ठिकाणी घडत होते. तर यामुळे पोलिसांवरील तणाव मात्र वाढलेला दिसून येत होता. मंदिर समिती चेे विठ्ठल-रुक्मिणीच्या गाभार्यात असणार्या सुरक्षा रक्षकांकडून दर्शनासाठी आलेल्या महिला व वृध्द भाविकांना ढकलण्याचा प्रकार घडल्याने कांही महिलांच्या कानातील, गळ्यातील दागिणे खाली पडल्याच्या घटना घडल्याची चर्चा असून प्रत्यक्ष परब्रम्ह पांडुरंगाच्या डोळ्यादेखत महिलांना ढकलणार्या व विठ्ठल भक्तांना अपमानास्पद वागणुक देणार्या अशा सुरक्षा रक्षकांची चौकशी होणे गरजेचे आहे. यापूर्वी मुंबईच्या एका महिला भाविकाने मंदिराच्या गाभार्यात विशिष्ट हेतून आपल्या अंगाला येथील एका कर्मचार्याने हात लावुन ढकलल्याबाबत पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु मंदिर समिती पदाधिकारी व पोलिस अधिकायांनी या महिलेची समजुत काढुन हे प्रकरण मिटविले होते. परंतु अजुनही जर तसा कांही प्रकार घडत असेल तर याबाबतची एखादी नविन तक्रार समोर येण्यापूर्वीच समितीचे अधिकार्यांनी मंदिराच्या गाभार्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासुन जर हे असे कृत्य करताना समितीचे कर्मचारी दोषी आढळले तर त्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी भाविकांमधुन होत आहे.


