परिचारक गटातून संधी मिळाली तरच प्रभाग क्रमांक 14 मधुन लढणार!- गणेश सिंघण ‘पडघम’ पंढरपूर न.प. निवडणुकीचे भाग- 3

पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आजी-माजी नगरसेवक व नवखे इच्छूक सज्ज झालेले आहेत. याच पार्श्‍वभुमीवर आम्ही दैनिक दामाजी एक्सप्रेस च्या माध्यमातून या सर्वांचे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे मनोगत टप्प्याटप्प्याने दररोज वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या पडघम पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीचे’ मध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील इच्छूक नगरसेवकपदासाठीचे उमेदवार गणेश नागेश सिंघण यांचे मनोगत…!

पंढरपूर (भगवान वानखेडे):- जर परिचारक गटातील आमच्या नेत्यांनी संधी दिली तरच नागालॅन्ड परिसरातील प्रभाग क्रमांक 14 मधुन नगरसेवक पदाची निवडणुक मी लढणार..! अशी प्रतिक्रिया दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या ‘पडघम’ साठी माहिती देताना खादी ग्रामोद्योग चे संचालक व पंढरीतील परिचारक गटाचे कट्टर समर्थक असलेले तरुण-तडफदार व उमदे व्यक्तीमत्व गणेश नागेश सिंघण यांनी व्यक्त केली आहे. गेल्या चार दशकाहून अधिक काळ पंढरीच्या राजकारणात, समाजकारणात व धर्मकारणात सक्रीय असणारे प्रा.नागेश सिंघण सरांचे चिरंजीव असल्याने राजकीय व सामाजिक कार्याचे बाळकडु गणेश सिंघण यांना बालपणापासुनच मिळालेले आहेत. खरं तर मागील दोन्ही पंचवार्षीक निवडणुकीत त्यांचे नांव चर्चेत होते परंतु प्रथम जनतेशी संपर्क साधुन जनतेची कामे करण्याचे धोरण स्वीकारुन त्यांनी गेल्या दहा वर्षापासुन प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचे कार्य केले आहे. यामध्ये प्रामुख्याने येथील लिंक रोडवरील अवजड वाहतुकीचा अनेक वर्षापासुनचा प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याचे खुप मोठे कार्य त्यांनी केलेले आहे.
पंढरीतील उपनगरवासीयांसाठी केंव्हाही सहज उपलब्ध असणारे संयमी व जनप्रिय व्यक्तीमत्व… गणेश सिंघण यांचे थोडक्यात मनोगत….!

 ‘‘खरं तर माझे वडील सिंघण सरांनी मला लहानपणापासुनच आपल्या नेत्यांवरील एकनिष्ठा, समाजाशी एकनिष्ठा व आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठा ठेवायला शिकविलेले आहे. स्वत:चा स्वार्थ वेळप्रसंगी बाजुला सारुन निरपेक्ष भावनेने केलेल्या चांगल्या कर्माचे फळ हे उशीराने का होईना गोडच लाभत असते. या तत्वानुसार मी समाजकार्यात सक्रीय झालो. कर्मवीर कै.औदुंबरआण्णा पाटील व कर्मयोगी मा.सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाने जशी सिंघण सरांनी समाजकार्यात धडाडीने कामे केली आणि नंतर नगरसेवक, शिक्षण समिती सभापती, पंढरपूर अर्बन बँकेचे विद्यमान सल्लागार, खादी भांडारचे विद्यमान अध्यक्ष आदी पदांवर प्रामाणिकपणे कार्य केले. हे करत असताना त्यांनी स्वत:हून कोणत्याही राजकीय पदाची अपेक्षा न ठेवता एक परिचारक गटाचा प्रामाणिक व एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्य केले. त्याचप्रमाणे मी सुध्दा गेल्या 10 वर्षापासुन आदरणीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक मालक,जिल्ह्याचे आमदार प्रशांतराव परिचारक, युटोपियन शुगर्स चे चेअरमन उमेशराव परिचारक यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली तसेच खर्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रणव परिचारक यांच्या सहकार्याने सामाजिक कार्यात सक्रीय झालो. तब्बल दहा वर्षात मी माझ्या प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क ठेवुन त्यांचा विश्‍वास संपादन केला आहे. नागरिकांच्यातून व आमच्या कार्यकर्त्यांमधुन, मित्रपरिवारामधुन, सल्लागारांमधुन माझ्या उमेदवारीबाबतची मागणी वाढु लागल्याने यावेळी परिचारक गटातून संधी मिळाली तर जनतेच्या सेवेसाठी प्रभाग क्रमांक 14 मधुन मी निवडणुक लढेन आणि या प्रभागातील वंदनीय मतदार बंधु-भगिणींच्या व आमच्या नेत्यांच्या आशिर्वादाने जिंकुन येईन..!’’
 असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, येथील लिंकरोड वरील अवजड वाहतुकीमुळे अनेक वर्षापासुन अनेक निष्पाप नागरिकांचे बळी गेले होेते. ही वाहतुक बंद करण्यासाठी पंढरपूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, वाहतुक शाखेचे निरीक्षक निलेश गोपाळचावडीकर, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता राऊतसाो, उपअभियंता गावडेसाो  व सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्याशी पत्रव्यवहार करुन निवेदने देऊन लिंकरोडवरील भयानक वस्तुस्थिती त्यांचे निदर्शनास आणुन दिली. या सर्व अधिकार्‍यांनी लिंकरोडची पाहणी केली. आणि गेल्या कित्येक वर्षापासुनचा हा प्रश्‍न मार्गी लागला. या मार्गावर आवश्यक तेथे गतीरोधक बसले, दिशादर्शक व सुचना फलक बसले. एवढ्यावरच न थांबता या मार्गावरुन अहोरात्र होणारी अवजड वाहतुक कायमस्वरुपी बंद करण्यात यश मिळाले. दर महिन्याला कुणाचा ना कुणाचा बळी घेणार्‍या या मार्गावरील अवजड वाहतुक बंद झाल्यानंतर एकही अपघात घडला नाही हे माझ्यादृष्टीने येथील उपनगरवासीयांसाठीचे मी मनापासुन केलेले प्रामाणिक कार्य आहे. यासाठी मला सहकार्य करणार्‍या सर्वांचा मी आभारी आहे.

उपनगरातील रस्ते, रोडलाईट, आरोग्य सुविधा, पिण्याचे स्वच्छ पाणी आदी मुलभुत सोयी-सुविधांबाबत येथील नागरिकांशी आमदार प्रशांतराव परिचारक यांचा सुसंवाद आमचे श्रीसिध्दीविनायक मंगलधाम येथे मी अनेकदा घडवुन आणण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या सांगितल्या याची नोंद घेऊन आदरणीय प्रशांतमालकांनी या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुत्रबध्द नियोजन केेले. याचे सर्वात मोठे फलीत म्हणजे प्रशांतराव परिचारक नगरमध्ये स्वतंत्र मोठी पिण्याच्या पाण्याची उपनगरांतील नागरिकांसाठी उभी राहीली. लिंकरोडच्या पश्‍चिमेेकडे असणार्‍या उपनगरांचा मोठा पाणी प्रश्‍न कायमस्वरुपी मिटला. यानंतर उर्वरीत समस्या सोडविण्यासाठी आदरणीय उमेशमालकांच्या उपस्थितीतही प्रभागातील नागरिकांचा सुसंवाद घडवुन आणला होता. आज आमच्या या प्रभागातील बहुतांश समस्या त्याचमुळे सुटलेल्या आहेत. वाढीव भागातील कांही कामे अजुन बाकी आहेत. ती कामे पुर्ण करण्याचे नियोजनही झालेले आहे.
तत्कालीन डीवायएसपी प्रशांत कदम, पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपनगरातील नागरिकांचा व पोलिसांचा सुसंवादही अनेकदा घडवुन आणला आहे. त्यामुळे उपनगरांमधील कायदा व सुव्यवस्था तसेच नागरिकांची सुरक्षा अबाधीत राहणे सुलभ झाले. उपनगरांमधुन पोलिस मित्र नियुक्तीही करण्यात आलेली आहे. माझा मुलगा चि.रुद्रप्रतापसिंह याच्या वाढदिवसादिवशी कोणताही डामडौल न करता पर्यावरणाचा समतोल अबाधीत राहण्यासाठी आदरणीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते प्रभागातील नागरिकांना विविध वृक्षांची 101 रोपे वाटप केली. आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाचा शुभारंभ, उपनगरात वृक्षारोपण आदींसह अनेक लोकोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. आमच्या सिंघण नगरमधील बागेमध्ये बोअर घेतलेला आहे. श्रीगणेशाच्या कृपाआशिर्वादाने त्याला बारमाही मुबलक पाणी असते. त्या बोअरचे पाणी उन्हाळ्याच्या दिवसात येथील नागरिकांना मोफत पुरविले जाते.

उपनगरातील थोर वंदनीय जेष्ठ मंडळींचा आशिर्वाद व सर्वसामान्य नागरिकांच्या सदीच्छा माझ्या पाठीशी आहेत. परिचारक घराण्यातील प्रत्येकाच्या सदीच्छा व आशिर्वाद तर कायमच पाठीशी आहेत. याचसोबत सिंघण सरांचा मित्रपरिवार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव पापरकर, ऐतवाडकर सर, अप्पा वांगीकर, प्रद्युम्न सावंत सर, बारसावडे बंधु, बेलपत्रे मॅडम, भगत सर, शिंदे मॅडम, अप्पासाहेब राऊत, अंकुश चव्हाण, रामा चव्हाण, संदीप जगताप, भाऊसाहेब जगताप, रवी सोनार, रावसाहेब मेणकुदळे, सुधाकर बंदपट्टे, आशिषकुमार लांडगे, सतीश श्रीखंडे, सुधीर भाळवणकर, अविनाश कोळी सर, दादासाहेब फत्तेपूरकर, शाम गोगाव सर, तात्या पाचारणे, एकनाथ ननवरे, नवनाथ रानगट, चारुदत्त ताठे, किशोर देशपांडे, डॉ. बेणारे, सत्यवान गोडसे, अनिल नलवडे तसेच एंजेल फ्रेंडस् ग्रुप, सेवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांचे आशिर्वाद, व सदिच्छा माझ्या पाठीशी कायमच असतील याची मला खात्री आहे.

माझ्या प्रभागातील नागरिकांची सेवा हीच ईशसेवा समजुन त्यांच्या सेवेसाठी व त्यांच्याच आग्रहाखातर ही निवडणुक मी लढविण्याचा निर्धार घेतला आहे. परंतु परिचारक गटाच्या आमच्या सर्व नेत्यांनी परवानगी दिली तरच ही निवडणुक मी लढविणार असून या प्रबागातील परिचारक गटाचे असंख्य कार्यकर्ते या निवडणुकीत मला आनंदाने सहकार्य करतील व जनता-जनार्दनाच्या आशिर्वादाने ही निवडणुक मी जिंकेन अशी आशा आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *