पंढरपूर, दि. 08 : सोलापूर शहरासाठी एनटीपीसीच्या माध्यमातून करावयाच्या पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया तात्काळ सुरु करा अशा सूचना आज विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता बीं.डी.यमगर यांना दिल्या.
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि एनटीपीसी यांच्या दरम्यान सामंजस्य करार झाला आहे. या करारानुसार एनटीपीसी 250 कोटी रुपये प्रकल्पासाठी खर्च करणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन कंपनी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. यापुर्वी झालेल्या बैठकीत 250 कोटी रुपये निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यास महानगरपालिकेचा विरोध होता.
यासाठी आज महापौर सुशिलाताई आबुटे, उपमहापौर प्रविण डोंगरे, स्थानिक समिती सभापती रियाज हुंडेकरी, सभागृह नेता संजय हेमगड्डी, चेतन नरुटे, नरेंद्र काळे, आयुक्त विजय काळम पाटील यांनी विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांची माळशिरस येथे शासकीय विश्रागृहावर आज दुपारी भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी रणजीतकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे उपस्थित होते.त्यावेळी महापौर सुशिलाताई आबुटे यांनी पाणी पुरवठा योजनेबाबत महापालिका प्रशासन आणि एनटीपीसी यांच्या दरम्यान करार झाला आहे.त्यामुळे ही योजना पुर्ण करण्याच अधिकार माहापालिका आणि एनटीपीसीकडे असायला हवेत. त्यासाठीचा निधी खर्च करण्याचे अधिकारही महापालिका आणि एनटीपीसीकडे असायला हवेत, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास प्रकल्प व्यवस्थापन आणि सल्लगार शुल्क म्हणून प्रकल्प खर्चाच्या तीन टक्के रक्कम देण्याची महापालिकेने तयारी दर्शविली आहे. मात्र महाराष्ट जीवन प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक मंडळाने पाच टक्के द्यावी असे, सुचवले आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर त्याबाबत महापालिका सकारात्मक भूमिका घेईल असे यावेळच्या चर्चेत सांगण्यात आले.
यानंतर विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पुण विभागाचे मुख्य अभियंता बी.डी.बंडगर यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. आणि पाणी पुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेचा तात्काळ सुरवात करा, अशा सूचना दिल्या.
आयुक्त विजय काळम -पाटील यांनी एनटीपीसीकडून येणारे 250 कोटी रुपये एनटीपीसी आणि सोलापूर महापालिकेच्या संयुक्त खात्यात ठेवले जातील. योजनेचे काम जसजसे पुर्ण होत जाईल तसे या खात्यातून देयके भागविण्यासाठी पैसे काढण्यास सोलापूर महापालिकेकडून नाहरकत परवाना दिला जाईल, असे सांगितले. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता, महापालिकेचे अभियंता भालेराव, संजय धनशेट्टी आदी उपस्थित होते
