पंढरपूर दि.20: जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी उद्या मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, या निवडणूकीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात होणा-या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी मतदान यंत्रे, मतदार यादी यासह आवश्यक साहित्य घेवून मतदान केंद्रच्या ठिकाणी रवाना झाले. या कर्मचा-यांना त्यांच्या मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 32 एस.टी.बसेस आणि 10 अन्य वाहनांची सोय करण्यात आली होती.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी होणारी निवडणूक सुरळीतपणे आणि निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या असून, पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यात 250 मतदान केंद्रावर 2 लाख 37 हजार 981 मतदाते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.यासाठी 1 हजार 375 निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 4 कर्मचारी 1 पोलीस कर्मचारी अशी नियुक्ती करण्यात आली आहे तर क्षेत्रियस्तरावर 16 अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यात सरकोली, टाकळी, तुंगत आणि गादेगांव येथील 18 संवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच तालुक्यात धोंडेवाडी आणि सुपली ही दोन आदर्श मतदान केंद्र असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.
