पुण्यात स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून भाजपा कार्यालयात जोरदार राडा
पंढरपूर Live18 April
पुण्यातील भाजप कार्यालयात सोमवारी स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून जोरदार राडा झाला. यावेळी गणेश बीडकर आणि गणेश घोष यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पुणे भाजपच्या कार्यालयात आज स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज भरण्यात येणार होते. यामध्ये गणेश घोष यांना स्वीकृत नगरसेवकपद मिळणार हे जवळपास निश्चित होते. मात्र, अखेरच्या क्षणी घोष यांना डच्चू देण्यात आला आणि पक्षाकडून गणेश बीडकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली.
मुळात भाजपकडून महानगरपालिका निवडणुकीपूर्वी एखाद्याला नगरसेवकपदासाठी उमेदवारी दिल्यास भविष्यात त्याचा अन्य कोणत्या पदासाठी विचार करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, गणेश बीडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ऐनवेळी चक्रे फिरवून स्वीकृत नगरसेवकपद पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे.
दरम्यान, भाजपकडून गणेश बीडकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर घोष यांचे कार्यकर्ते चिडले. त्यांनी बीडकर यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यामुळे भाजप कार्य़ालयात मोठा गोंधळ निर्माण झाला. घोष यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील कुंड्यांची आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. या हाणामारीत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसली तरी बीडकर यांच्या टीशर्ट फाटल्याचे समजत आहे.
