सोलापुरातील नवीन विडी घरकुल परिसरात एका व्यक्तीने पतीने मारहाण करत तिचा कान कापल्याची घटना घडली आहे. आरीफा अकिल सय्यद असे पीडित महिलेचे नाव असून तिचा पती अकिल शकील सय्यद फरार झाला आहे.
घटनेनंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तिच्या कानावर शस्त्रक्रिया केली आणि ३० टाके घालून तिचे कान जोडले. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही विधवा होती. २०१५ पासून ती अकिल सय्यदच्या संपर्कात आली. अकिल हा रिक्षा चालक असून तो देखील विवाहित होता. पहिली पत्नी असतानाही त्याने आरिफा सोबत २०१९ मध्ये निकाह केला. अकिल सय्यदला पहिल्या पत्नी पासून एक मुलगा आहे.
लग्नापूर्वी आरिफा ही विधवा होती हे माहित असतानाही अकिलने तिला चांगले नांदवण्याचे आश्वासन दिले होते. पण विवाहानंतर चारित्र्यावर संशय घेत तो तिच्यावर घरगुती हिंसाचार करत होता. या प्रकरणी पीडित महिलेने अकिल नेहमी मारझोड करत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.



