01 May.2017
औरंगाबाद- शनिवारी सायंकाळी अचानक नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस आयुक्तांचे आदेश निघाले. शहरात रात्री ऑल आऊट ऑपरेशन राबवून मद्यपी वाहनचालक पकडण्याचे आदेश निघाले. वाहतूक पोलिस विभागाला आदेश मिळताच पावणेदहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत मद्यपी वाहनचालकांची धरपकड सुरू होती. शनिवारी रात्री एकूण ३६ मद्यपी वाहनचालकांवर कलम १८५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
नव्यानेच रुजू झालेल्या यशस्वी यादव यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी दिवसभर अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठक घेतल्या. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त यादव यांनी अचानक वाहतूक पोलिस विभागाला आदेश दिले. आदेश प्राप्त होताच वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना घेऊन मोहीम हाती घेतली. साधारण सात वाजेच्या सुमारास कारवाईला सुरुवात करण्यात आली. शहराच्या विविध भागांमध्ये चेक पॉइंट लागले. रात्री दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त यशस्वी यादव, सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिंदे, शिनगारे, सहायक पोलिस निरीक्षक राठाेड यांनी कारवाई पार पाडली. शनिवारी पार पडलेली कारवाई कायमच राबवली होती, परंतु यापुढे आता मद्यपी वाहनचालकांवर नियमित कारवाई सुरू राहील, अशी माहिती शेवगण यांनी दिली.
ऑलआऊट ऑपरेशन
– यात जालना रस्ता, गजानन मंदिर, नगर नाका, बाब पेट्रोल पंप चौक, टीव्ही सेंटर चौक, बीड बायपास आदी ठिकाणांवर कारवाई करण्यात आली.
– एक सहायक पोलिस आयुक्त, ११ निरीक्षक, उपनिरीक्षक आणि एकूण ४० कर्मचारी रात्री आदेश मिळताच कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
– २५० पेक्षा अधिक वाहनचालकांची रात्री वाजेपर्यंत ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली.
– सामान्यत: ३१ डिसेंबर, धूलिवंदन तसेच काही प्रमाणात ड्राय डेच्या दिवशीच शक्यताे पोलिस विभागातर्फे ड्रंक अँड ड्राइव्हची तपासणी करण्यात येते. शनिवारी रात्री झालेल्या या कारवाईमुळे मद्यपी तसेच वाहनचालकांची चांगलीच भंबेरी उडाली.

