यापुढे मुलगी का नको? चा जागर करणार- खासदार सुळे

यापुढे मुलगी का नको? चा जागर करणार- खासदार सुळे

5 May. 2017

सासवड येथे सामुदायिक सोहळ्यात 18 जोडपी विवाहबद्ध
वाघापूर (प्रतिनिधी) – सासवड येथील आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सलग 11 वर्षे सामुदायिक विवाह सोहळा चालविणे हे खरोखरच नावाप्रमाणे आदर्श काम आहे. वास्तविक पाहता देशातील अनेक मुलींनी केवळ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आदराचे स्थान मिळवून आदर्श निर्माण केला आहे. मात्र, आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षाच येत आहे. परंतु त्यांना त्यांचे स्थान मिळावे त्यांचा सन्मान व्हावा यासाठी यापूर्वी आपण मुली वाढवा, मुली वाचवा हा जागर संपूर्ण देशभर राबविला होता. त्याचधर्तीवर यापुढे मुलगी का नको? चा जागर करणार आहोत. त्यामुळे त्यांचे स्थान बळकट होईल. तसेच अशा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे भविष्यात मुलींना कोणी हुंडाच मागणार नाही, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सासवड येथील पुरंदर महाविद्यालयाच्या प्रांगणात आदर्श क्रांती संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार सुळे यांनी संघटनेचे काम अतिशय चांगले असून यापुढे 100 वर्षे असाच हा उपक्रम मोठ्या दिमाखात पार पडेल, अशा शुभेच्छाही दिल्या. श्री क्षेत्र नारायणपूर येथील श्री दत्त मंदिराचे परमपूज्य नारायण महाराज हे यावेळी वधू – वरांना आशिर्वाद देण्यासाठी प्रमुख म्हणून उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रवीण माने, सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, माजी जि.प. सदस्या ऍड. सारिका इंगळे, सुदाम इंगळे, बबूसाहेब माहूरकर, माजी उपसभापती माणिकराव झेंडे, बापू कटके, आर. एन. जगताप, हभप बाळासाहेब काळे, राहुल शेवाळे, शिवाजी पोमण, संघटनेचे संस्थापक संजय जगताप, अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, उपाध्यक्ष विकास जगताप, सचिव राहुल इनामके, सुनील जगताप, गिरीश कर्नावट, तसेच पदाधिकारी, वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.
यावर्षी चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्यांना जिद्दीने जगण्याची ताकद द्यावी, असे खासदार सुळे यांनी देवाकडे प्रार्थना करतानाच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, यासाठी शासनाला जाग येऊ दे, अशा खोचक शब्दांत त्यांनी शासनाला शालजोडीतले फटकारे मारले.
यावेळी परमपूज्य नारायण महाराज यांनी नवदांपत्यांना भावी आयुष्यात सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आदर्श निर्माण करावा. आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा केल्यास भविष्यात वृद्धाश्रमांची संख्या नक्कीच कमी होईल, असा विश्वास व्यक्‍त केला.
आदर्श क्रांती संघटनेचे संस्थापक संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच प्रा. जितेंद्र देवकर आणि रामभाऊ झेंडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी झालेल्या सोहळ्यात सुमारे 18 जोडपी विवाहबद्ध झाली. या सर्वांना संघटनेच्या वतीने संपूर्ण पोशाख, हळदीची साडी, मंगळसूत्र, शेलकट, उपरणे, ओढणी, संसारोपयोगी भांडी, मनगटी घड्याळे, बूट-चप्पल, लग्नपत्रिका, फेटा, बाशिंग, मुंडावळ्या व इतर सर्व वस्तू देण्यात आल्या. त्याचप्रमाणे विवाहासाठी येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना चांगल्या पद्धतीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *