7 May. 2017
बोधेगाव, दि.6 (वार्ताहर)- शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील विवाहित असलेल्या सख्या नणंद-भावजयाचा कपडे धुताना जायकवाडी उजव्या कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी हातगाव शिवारात घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, भीषण पाणी टंचाईमुळे बोधेगाव येथील भाजीपाल्याचे व्यापारी अल्लाउद्दीन बागवान यांची सून हिना सलीम बागवान वय 27, रा.बोधेगाव,ता.शेवगाव व विवाहित मुलगी यास्मीनी दाऊत बागवान वय 25, बोधेगाव हल्ली, रा.तपनेश्वर गल्ली, जामखेड या नणंद भावजयी दोघी बोधेगाव येथे पाणी टंचाई असल्यामुळे लगतच्या हातगाव शिवारातील जायकवाडी उजव्या कालव्यावर कपडे धुण्यासाठी शनिवारी सकाळी गेल्या होत्या. परंतु गोधडी धूत असताना दोघींचा पाण्यात तोल गेला. त्यांना वाचविण्यासाठी लगत असणाऱ्या महिलांनी प्रयत्न केला. मात्र दोघी पाण्यात बुडाल्या. तेथील महिलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी आसपासच्या ग्रामस्थांनी धावपळ करून त्यांचा शोध घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने त्या वाहून गेल्या. नागरिकांनी शोध घेतल्यानंतर एकीचा शोध लागला. तिला तातडीने उपचारासाठी हलविले. परंतु नगर येथे उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. दुसरी महिला नंतर सापडली मात्र तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. बागवान यांच्या कुटुंबातील टाकळीमानूर ता.पाथर्डी येथे दोन दिवसापूर्वी लग्न समारंभ होता. त्यासाठी त्यांची मुलगी यास्मीनी कुटुंबासह माहेरी आई-वडिलांकडे बोधेगाव येथे आली होती.



