👁 10 Views

वकिलांचे समाजाप्रति योगदान महत्त्वाचे

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
– पी. एल. भांडारकर स्मृती पुरस्कार सोहळा

नागपूर, १२ मे
समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यातच वकिलांचा मोठेपणा सिद्ध होतो. वकिली या व्यवसायामध्ये काम करीत असताना तुम्ही किती पैसा कमविला आहे, यापेक्षा समाजाप्रति तुमचे योगदान किती आहे हे महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू पी. एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट नवोदित वकिलांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजिण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्या. भूषण गवई, महाधिवक्ता ऍड. रोहित देव, असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. पद्‌मा चांदेकर व सचिव ऍड. रितू कालिया उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ज्ञानवृद्धीतून वकिली व्यवसाय कसा समृद्ध करता येईल यासाठी नवोदित वकिलांनी प्रयत्न करायला हवे. नवोदित वकिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार फार महत्त्वपूर्ण ठरतात. पुरस्कार हा जीवनाच्या वाटचालीतील थांबा असतो. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याने हुरळून न जाता येणार्‍या काळात वरिष्ठ वकिलांसोबत अधिक नम्रतापूर्वक वागले पाहिजे, असाही सल्ला यावेळी फडणवीस यांनी नवोदित वकिलांना दिला.
न्या. भूषण गवई म्हणाले, पी. एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा हा पुरस्कार नवोदित वकिलांसाठी नक्कीच प्रोत्साहन देणारा आहे. वकिली हा केवळ व्यवसाय नाही तर एक सेवाभावी पेशा आहे ही गोष्ट वकिलांनी नेहमी ध्यानात ठेवायला हवी. या व्यवसायाकडे फक्त पैसा कमविण्याचे साधन या दृष्टिकोनातून न बघता समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून कार्य करावे. ज्याचा पाया भक्कम असतो, त्याचा कळस देखील तितकाच मजबूत असतो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये येणार्‍या नवोदित वकिलांनी सुरुवातीला अधिक मेहनत घेतली तर त्यांना यश नक्कीच मिळेल.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ६ महिने ते ४ वर्षे वयोगटातील उत्कृष्ट नवोदित वकील म्हणून ऍड. समीर सोनवाने यांना तर ४ ते ८ वर्षे वयोगटामध्ये ऍड. स्विटी भाटिया व ऍड. प्रवीण अग्रवाल यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट न्यायालयीन वार्ताहर म्हणून लोकमतचे पत्रकार राकेश घानोडे यांना पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक ऍड. पद्मा चांदेकर यांनी केले. आभार ऍड. रितू कालिया यांनी मानले. यावेळी न्यायमूर्ती, वरिष्ठ विधिज्ञ, असोसिएशनचे पदाधिकारी, श्रीरंग भांडारकर व अंजली भांडारकर उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *