गावाकडील आठवणी..
“लालाबुवाची शिवाई!”..
त्या वर्षी जून महिन्यात पावसाने चांगली सुरुवात केली.आधीच नांगरुन-वखरुन तयार केलेली व उन्हामूळे त्रस्त झालेली काळीशार शेतमाऊली..
थंडगार पावसाच्या सरींनी फुलारुन उठली!..
जमिनीत पेरणी करण्याईतपत पुरेशी ओल झाली.
पेरणी करायची एकच धांदल सुरु झाली!..
गावातील रंगनाथ सुताराला जेवायला सवड मिळेनाशी झाली.दिवस उजाडण्यापासून ते पार मावळेपर्यन्त रंगनाथ सुताराच्या किक्र-वासल्यावरील हतोड्याचे आवाज घडीभरसुद्धा थांबत नव्हते.
एरव्ही वरीसभर झोपा काढून कंटाळलेल्या रंगनाथ सुताराला कुणी विडीलासुद्धा विचारत नसे!.
आता मात्र त्याचे राजेशाही वैभव परत आले होते..
दिवसभर सतत दहा-पंधरा शेतकरी त्याच्या अंगणात औतं घेऊन,ते तयार करुन द्यायसाठी त्याची खुशामत करत बसलेले असायचे!..
‘कुसलीसाठी असं लाकुड चालते काय?..
आणी ह्या मरतुकड्या पेरकांडाचं जू बनत असते काय??
कुणबी हाय का वखरावरचा गोटा हाय तुमी??”..
असे वस्सकनं ओरडत रंगनाथ सुतार दिवसभर कुणब्यांवर डाफरत रहायचा!..
शेतकरी बिचारे मनातल्या मनात, “अडला नारायण….!”..
म्हणत मुकाट्याने ऐकून घेत असत!..
रंगनाथ सुताराला मात्र करवतीच्या पट्ट्यापेक्षा तोंडाचा पट्टा चालविण्यातच जास्त रस असायचा!..
असो!..
ईकडे सकाळी नऊच्या आसपास,सतीषच्या ‘बारोजवळील’ वाड्यात आज औतांची जुळवाजुळव सुरु होती!..
सतीषचे बाप्पू, दोन काका.. चार-पाच गडीमाणसं धावपळ करीत होते!..
कुणी बैलांना पाण्यावर नेत होते,
कुणी गाड्यांवर, तिफण-वखर, ठेवत होते.
कुणी बिजवाई, खताच्या गोण्या दुस-या गाड्यावर ठेवत होते.,
तर कुणी भाकरीचे पालव काळजीने पांजरला बांधत होते!..
तिफण-वखर वेठायचे दोर,बेळ्ळ्या,पासा सगळं तपासल्या जात होते.
अचानक सतीषच्या बाप्पूंच्या लक्षात आले की एक-दोन ‘शिवाई’ कमी पडत आहेत!..
(शिवाई म्हणजे..बैलांच्या गळ्यात बेळ्ळी अडकवल्यानंतर, बैल जुवामधून {जोत्यामधून} निसटू नये म्हणून एक लाकडाची गोल दांडी जूवाच्या शेवटच्या टोकाला असते व त्यात बेळ्ळी अडकवतात!..शिवाईला वरती ईंग्रजी Y सारखा आकार असतो!..)
या धांदलीपासून फारकत घेत..
वाड्यातील एका कोप-यात,.
निवांतपणे डोळे मिटून चिलीमीचा झुरका घेत बसलेल्या लालाबूवाला सतीषच्या बाप्पूंनी आवाज दिला..
“लालाबूवा!.. बारोच्या बाभुयांवरुन चांगल्या दोन-चार दणकट शिवाया काढून आणा बरं!”..
“हौ भाऊ!.. लगेच आणतो!..
बैल कितीबी खेटला शिवाईले,.
तरी माह्या हातची शिवाई अज्जीबात तुटणार नाही!”..
हातातील चिलीम लगबगीने विझवत,लालाबूवांनी जवाब दिला!..
नंतर मात्र शांतपणे चिलीमीला हातावर ठोकत..
त्यातील खडा काढला!..
चिलीम,खडा,चकमक,कोसला..
सारे साहीत्य,कापडाच्या छोट्या चंचईत भरले!..
व चंचई बांडसाच्या खिशात ठेवली.
धारदार ‘ईव्वा'(कोयता) घेऊन लालाबूवा ‘बारो’ जवळील बाभळवनाकडे चालता झाला!..
लालाबूवा!..
वयाची चाळीशी गाठलेला,निष्कपट,साधाभोळा शेतमजूर!..
ब-यापैकी ऊंची!..
ऊनपावसात सतत राबून काळी पडलेली त्वचा!..
भोळेपणाचा शांत भाव असलेले मोठे गोल डोळे!..
अंगात खादीचे बिना कॉलरचे व आखूड बाहीचे बांडीस!..
गुढग्यापर्यन्त असलेले धोतर!..
डोक्यावर अपूरी पडत असलेली मळकी टोपी!!..
बारोच्या जुनाट पाणवठ्याजवळील त्या बाभळवनात प्रचंड आकाराच्या तेली बाभळींचे घनदाट जाळे पसरलेले होते..
बाभळींच्या दाटीवाटीमुळे तिथे दिवसाही किट्ट अंधार असायचा!..
बाभळींचे मोठेच्या मोठे काटे बघून अंगावर काटा यायचा!..
दाट काट्यांनी व फांदो-यांनी भरलेली, एकेक बाभळ तीस-चाळीस फूट ऊंच व तितकीच रुंद अशी विस्तीर्ण होती.
लालाबूवा शिवाई आणायला निघून गेला!..
आणी ईकडे सर्व तयारी होऊन वाड्यातून ही वरात पेरणीसाठी मुसईच्या वावराकडे थाटात निघाली!..
अर्ध्यापाऊन तासाने मुसईचे वावर आले!..
सर्व औतं गाड्यावरुन काढून,वखराला पासा-खरदांड्या ठोकठाक करुन बसवण्यात आल्या!..
सोपानबुवाने तिफण झक्कास वेठली!..
मागे खत टाकण्यासाठी तिन्ही कुसल्यांना सरते बांधण्यात आले.
बायांनी खतासाठी ओटी बांधल्या!..
पेरणारा-तिफण हाकणारा.. सज्ज झाले!!..
परंतू खतामागील वखर हाकणारा गडी लालाबूवाचा अजुनही पत्ता नव्हता!..
दहा-पंधरा मिनीटं लालाबूवाच्या गलथानपणावर संताप करुन शेवटी सतीषच्या बाप्पूंनी तो वखर धरला..
एकदाची पेरणीला सुरुवात झाली..
दुपारी दोन वाजता जेवणासाठी औतं थांबले!..
बैलांवरचे औतं काढून त्यांना ओहोळावरील पाणी पाजण्यासाठी दोन गडीमानसं घेऊन गेले!..
निंबाच्या झाडाखाली पिकलेल्या निंबोळ्यांचा सडा पडलेला होता.
त्यांचा मधूर-उग्र सुवास सर्वत्र दरवळत होता!..
लाल तेलमुंग्या झाडाखाली भक्ष शोधीत ईतस्तत: फिरत होत्या!..
पावसाळी दमट वातावरणामूळे हवा कुंद झाली होती.
अंग घामाने चिपचिपले होते.
हातापायाला गार पाण्याने धुतल्याने सर्वांचा शीण निघून गेला..
निंबाच्या दाट सावलीखाली,..
लाल तेलमुंग्यांपासुन आपला बचाव करत..
कडकडून लागलेल्या भुकेने अधीर होत,सर्वांनी आपआपल्या भाकरी सोडल्या!..
कुणाच्या भाकरीवर लाल मिरचीची सुकी चटणी,लोणचं, कांदा..
कुणाच्या भाकरीवर तुरडाळीचे घट्ट वरण व मीरकूट..
तर कुणाच्या भाकरीसोबत कळण्याच्या वड्या!..
चविष्ट स्वादाचे ते व-हाडी ‘वनभोजन’ सुरु झाले!..
अचानक कुणालातरी पुन्हा लालाबूवाची आठवण झाली!.
मग मात्र सर्वांनाच चिंता वाटायला लागली…
लालाबूवा का बरं आला नसेल??..
सर्वांना वाटले.. “लालाबूवाला घरुन काही कामानिमीत्त बोलावणं आलं असेल!”..
दिवसभर पावसाने सवड दिल्यामुळे त्या दिवसाची पेरणी छानपैकी उरकली.
सायंकाळी सर्व मंडळी आनंदाने घराकडे परतली..
वाड्यावर परतल्यावर गुरांचा चारापाणी करतांना..
दिवसभराच्या झालेल्या श्रमाने सारे दमून गेले होते!.
तशात लालाबूवाच्या काळजीपोटी सतीषच्या बाप्पूंनी सतीषला सांगीतले..
“लालाबूवाच्या घरी जा!.. व लालाबूवा आज शेतात का आला नाही ते बघून ये बरं!”..
सतीष लालाबूवाच्या घरी गेला.
लालाबुवाची पत्नी नुकतीच शेतातून येऊन चूल पेटवत होती.
झोपडीत ओल्या सरपणामूळे धूर दाटला होता.
अंगणात लालाबूवाची म्हातारी आई बसलेली होती. वार्धक्यामुळे ती दिवसभर घरीच असे.
म्हातारीला बघून सतीष म्हणाला,..
“बूढे!..
लालाबॉ काहून नाही आला तं आज वावरात?..
त्यापायी बाप्पूले आज वखर धरा लागला!..
काहीबी हाये बॉ या बुवाचं काम!!..
निदान सांगून तं राह्यता घरी?..
दूसरा मानूस नेला असता नं त्याह्यच्याजागी!”..
हे ऐकून म्हातारी एकदम दचकली!..
आश्चर्याने म्हणाली..
“कारे मह्या नाता?..
माहा लेक तं सकाऊनंच तुह्या वाळ्याकडे गेल्ता!..
आजुनबी घरी आला नाही!.
आन्ं तू हे काय सांगुन राह्यला?..
कूठी हाये रे बापा मंगंन माहा लेक?”..
ह्या दोघांचा संवाद ऐकून लालाबूवाची बायको झोपडीतून बाहेर आली.
आणी तीने एकदम मोठमोठ्याने गळा काढून रडायलाच सुरुवात केली!..
“माहा मानूस कूठीसा गेलाशीन माय वं!..
आता मी कसं करु वं!!..
माहा मानूस साधाभोया हाये!..
त्याचं काय झालंशीन वंsssss.. माय!!…
आरडाओरडा ऐकून सारे लोकं गोळा झाले!..
सर्व चौकशी केल्या गेली!.
नाही नाही त्या शंका-कुशंका,तर्कवितर्क काढायला सुरुवात झाली!..
शेवटी कुण्यातरी समजदार माणसाने म्हटले..
“आगुदर बारोकडे चाला!..
तठीसाक पाहू पह्यले!”..
सतीष सोबत दोन-चार दणकट माणसं कंदील,कु-हाडी घेऊन बारोकडे निघाले!..
बारोजवळ ही मंडळी पोचली तेंव्हा अंधार चांगलाच दाटून आला होता.
आधीचेच भेसुर असलेले बारोचे बाभळवन अधीकच भयावह वाटत होते!.
घूप्प अंधारात दूरुनच एकाने आवाज दिला..
“लालाबॉ हो s_s_s….. !!”..
भयाण शांततेत एक दोन क्षण गेले!..
आणी त्या किट्ट बाभळवनातून,
आकाशवाणी झाल्यासारखा..
एका बाभळीवरुन लालाबुवाचा आवाज आला…
“अठीसा हाये हो बापहो मी!..
या मंधल्या बाभूयवर!!..
आगुदर मले पाणी द्या पियाले !!”…
त्या आवाजाच्या दिशेचा अंदाज घेत..
मंडळी कंदिलाच्या मंद उजेडाच्या मदतीने बाभळवनात शिरली!..
आवाज येत असलेल्या बाभळीजवळ येऊन पोचल्यावर एकदम थबकली!.
वरतून अंधारातून आवाज येत होता..
“मले सकाऊन या बाभूयवर लयम्होट्या शिवाया अन्ं जूवाचे दांडे दिसले!..
मी कंबरले ईव्वा खोचून वर चढलो!..
दाट काट्या अन्ं फांजो-या च्यानं मले पाह्यजे त्या डांगीजोय पोचता येना!!..
मंग मीनं मंधात आळवे येणारे सगळे काटे अन्ं फांजो-या छाटल्या!..
ईकळल्या डांगीवरची शिवायी काहाळली!!..
मंग तिकळल्या डांगीवरचं जुवाचं लाकूड तोळलं!..
अासं करत करत..
चांगल्या पाच-सात शिवाया…
अन्ं जूवासाठी दोन खमके लाकडं तोळले!!..
मंगन्ं बाभुयहून खाली उत-याले लागलो!..
पनं खाली पाह्यलं तं तुमाले काय सांगा राजेहो !!…
“ह्ये टप्पोरे काटे अन्ं फांजो-यायचा सळाच सळा!!”..
“मले खाली कसं उतरा हेच समजेना!!!”..
©धनराज पाटील (घोंगटे), आव्हा.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




