पंढरपूर लाईव्ह (विशेष वृत्त):- दि.17 मे 2017
पंढरपूर शहरातील विस्थापीत नगर झोपडपट्टीतील तब्बल सात ते आठ झोपड्या अतिक्रमण करुन टाकल्याचे कारणामुळे पंढरपूर नगरपरिषदेने नुकत्याच उध्दवस्त केल्या. या ठिकाणचे वीज कनेक्शनही तोडले गेले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. विस्थापीत नगरमधील या जागेवर विस्थापीत कुटूंबांना जागा देण्यात आलेल्या आहेत. याचबरोबर या ठिकाणी अनेकांनी अतिक्रमणेही केलेली आहेत. या कारणामुळे येथील कांही घरांवर नगरपरिषदेच्या वतीने पोलिस बंदोबस्तात हातोडा चालवला गेला.
येथे कांही महिला या गरीब कुटूंबातील असून धुणी-भांडी करुन, रोजंदारी करुन, कसेबसे आपला व आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवित आहेत. येथील कांही महिला होमगार्ड, नर्स, फुले गुंफणारे आहेत. अशा सात महिलांनी आपल्या झोपड्या उध्दवस्त झाल्या तरी लेकराबाळांना घेऊन जायचे कुठे म्हणत याच ठिकाणी उघड्यावर राहणे पसंद केले आहे. पंढरपूर नगरपरिषदेने माणुसकीच्या भावनेतून आम्हाला पर्यायी जागा द्यावी. गेल्या कित्येक वर्षापासून आम्हीू येथे राहत आहोत. भाडयाने घर घेण्याएवढी आमची आर्थिक कुवत नाही. तरी आम्हाला न्याय मिळावा अशी आर्त हाक या महिलांनी दिली आहे. अतिक्रमणच काढायचे होते तर सरसगट काढा.. सर्वांना समान न्याय द्या..! काही जणांना आश्रय द्यायचा आणि काहीजणांना निराधार करायचे हा कसला न्याय..? असा नाराजीचा सुर या महिलांमधून ऐकावयास मिळत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करणे मात्र धोकादायक आहे. महिलांची व मुलींची सुरक्षा धोक्यात आहे. या ठिकाणी कांही अनुचित प्रकार घडु नये यासाठी सदर बाबतीत नगरपालिका प्रशासनाने योग्य तो तोडगा काढून हा प्रश्न मार्गी लावणे अत्यावश्यक आहे.
प्रस्थापितांच्या बंगल्यांची शोभा जाते म्हणून गोरगरीबांच्या झोपड्या हटविल्या-सुधामती माळी
या भागात कांही प्रस्थापीत मंडळींचे बंगले आहेत, जागा आहेत. यांच्या बंगल्यांचे सौंदर्य आमच्या झोपड्यांमुळे बाधीत होते म्हणून हेतुपरस्पर आमच्या झोपड्या हटविण्याचे कटकारस्थान कांही राजकीय लोकांच्या सांगणेवरुन झाले आहे. आमच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न झाला आहे. कांही वर्तमानपत्रांमधून येथे अवैध धंदे चालतात अशा मथळ्याखाली बातम्याही प्रसिध्द केल्या आहेत. यामुळे आमची नाहक बदनामी झाली आहे. हा अन्याय आम्ही कदापीही सहन करणार नाही. आम्हाला पर्यायी जागा द्यावी व आम्हाला न्याय द्यावा असे मत पंढरपूर लाईव्हशी बोलताना सुदामती बळीराम माळी यांनी दिले.
आपले गार्हाणे मांडण्यासाठी येथील कांही महिला पंढरपूर लाईव्हचे कार्यालयात संपर्क साधून आपली व्यथा मांडली. यावेळी जयश्री सतीश माडगुळकर, मनिषा शशिकांत राऊत, जयश्री गणपत लेंडवे, गौरी अजय पाटील आदी महिला उपस्थित होत्या. लवकरच मुख्याधीकारी अभिजीत बापट यांचेशी भेटून न्यायाची मागणी करणार असल्याची माहितीही या महिलांनी यावेळी दिली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111







