👁 9 Views

माउलींच्या पालखीसाठी यंदाही जुनाच रथ

पुणे – संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यासाठी काही वर्षांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्यावतीने विकसित करण्यात आलेला बॅटरीवर चालणारा अत्याधुनिक रथ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गेल्या वर्षी पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात आलेला रथच यंदा वापरण्यात येणार असल्याचे आळंदी येथील श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान समितीने कळविले आहे.
पालखी सोहळ्यात रथाला जुंपलेल्या बैलावरील ताण कमी व्हावा, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त आणि हलक्‍या रथाची निर्मिती करण्याबाबत केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ विभागाकडे विचारणा करण्यात आली होती. 2012 मध्ये पालखी सोहळ्यादरम्यान रथाला जोडलेल्या बैलांसंदर्भात झालेल्या अपघातानंतर याबाबत समितीने विचारणा केली होती. त्यानुसार डीआरडीओनेसुध्दा या प्रस्तावाला अनुकूला दर्शविली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि बॅटरीच्या मदतीने गतिमान होणाऱ्या प्रणालीचा विकास करुन रथाची निर्मिती केली होती. हा रथ 2013 मध्ये झालेल्या पालखी सोहळ्यात ही वापरण्यात आला. त्यानंतर 2014 व 2015 अशी सलग दोन वर्षे हा रथ वापरण्यात आला.
या रथाची देखभाल आणि दुरुस्ती तसेच मालकीसुध्दा डीआरडीओ विभागाची होती. त्यामुळे पालखी सोहळ्यानंतर हा रथ पुन्हा डीआरडीओकडे परत केला जायचा. पालखी सोहळ्याच्या पंधरा दिवस आधी डीआरडीओचे अधिकारी व कर्मचारी या रथाची देखभाल व दुरुस्ती करुन ठेवायचे. पण, 2015 मध्ये नियमाप्रमाणे हा रथ ज्यावेळी देखभाल दुरुस्तीसाठी डीआरडीओकडे देण्यात आला, त्यावेळी या संस्थेने या रथामध्ये काही तांत्रिक त्रुटी उद्‌भवल्याचे कारण स्पष्ट केले. या तांत्रिक अडचणी 2016 मध्ये होणाऱ्या पालखी सोहळ्यादरम्यान पूर्ण होऊ शकणार नाहीत, असेही सांगण्यात आले. त्यामुळे अखेर गेल्या वर्षी जुन्याच रथाची दुरुस्ती व देखभाल करुन तो रथ पालखी सोहळ्यासाठी वापरण्यात आला होता.
यंदा पुन्हा या रथाबाबत डीआरडीओकडे आळंदी देवस्थान समितीने विचारणा केली होती. पण, वाहतुकीच्या सुरक्षेचा सर्वागीण विचार करता, तो रथ यापुढे वापरणे शक्‍य होणार नाही, असे अधिकृतपणे कळविले आहे. तसेच या रथाच्या देखभालीचे व दुरुस्तीचे हक्क हे डीआरडीओकडे असल्याने रथ हा ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटीकडे हस्तांतरित करता येणार नसल्याचेही संस्थेच्यावतीने कळविण्यात आले आहे.
जुन्या रथाची दुरुस्ती
यंदासुध्दा गेल्या वर्षी वापरण्यात आलेला जुना रथच पालखी सोहळ्यासाठी वापरण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यामुळे हा रथ दुरुस्त व पॉलिश करुन तयार ठेवण्यात आहे. संस्थानचे विश्‍वस्त व चोपदार यांनी सुद्धा या रथाची पाहणी करुन दुरुस्ती योग्य झाली असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे यंदा सुध्दा माउलींच्या पालखीला जुनाच रथ जोडण्यात येणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *