👁 11 Views

डॉक्टर आणि पोलीस हे जनतेचे मायबापच असतात की !

उशीर झालाय म्हणून जरा घाईगडबडीतच चाललो होतो. ट्रॅफिकही खूप नव्हतं. माझ्यासमोर एका मोटरसायकलवरून दोन मुलं चालली होती. अगदी सावकाश. त्यांना खेटून आणखी एक मोटरसायकल चालली होती. त्यावर दोन पोलीस होते. पोलिसांच्या मागून मी जात होतो.
थोडया वेळानं एक घटना घटली. एक मोटरसायकलस्वार डाव्या गल्लीतून जोरात आला आणि त्या तरुणांच्या मोटरसायकलवर धडकला. एक सेकंदात ती पोरं आडवी झाली.मागचं पोरगं लगेचच उठून उभं राहिलं पण पुढचं पोरगं अंगावर गाडी घेऊन गप्पगार पडलेलं. ते पडताक्षणीच बेशुद्ध झालेलं. सगळ्या गाडया झपाझप थांबल्या. मीही गाडीतून खाली उतरलो. जवळ जाऊन बघतोय तर पडलेल्या पोराच्या डोक्यातून फुटलेल्या माठातून पाणी गळावं तसं रक्त गळत असलेलं.
मी गाडी उचलायच्या आतच ते पोलीस पुढं आलेले. त्यातल्या म्हाताऱ्या पोलीसानं गाडी उचलून अक्षरशः बाजूला ढकलून दिली. त्या मुलाचं डोकं उचलून आपल्या मांडीवर ठेवलं आणि जखम बघून त्याच्या डोक्यावर हात दाबून धरला.
“अहो, कुणाची चारचाकी गाडी आहे का?” त्यानं विचारलं.
“थांबा, मी अँब्युलन्सला फोन करतोय.” त्याचा जोडीदार बोलला.
“अँबुलन्स ची कशाला वाट बघतोयस?….इथलीच गाडी बघ. अँबुलन्स येऊस्तोवर काहीतरी कमीजास्त होईल.”
तो म्हातारा पोलीस चांगलाच घाबरलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा लागल्या होत्या. माझ्या लक्षात आलं की तो त्या जखमी मुलाचा बाप आहे!
“माझी गाडी आहे!!…..घाला त्याला माझ्या गाडीत.” मी त्याला म्हटलं.
लगेच चौघांनी त्या मुलाला उचललं. दोघांनी हात धरले, दोघांनी पाय धरले आणि त्या मुलाला माझ्या गाडीत बसवलं. त्या पोलीसानं अजूनही त्या मुलाच्या डोक्यावरचा हात सोडला नव्हता. मुलाचं डोकं धरून तो तसाच गाडीत बसला. त्याचा जोडीदार पाठीमागून त्यांची गाडी घेऊन येत होता.
“लेकरू वाचावं रे देवा!….लेकरू वाचावं रे देवा !” हॉस्पिटल येईपर्यंत त्या पोलिसाचा एकच जप चाललेला.
मी हॉस्पिटलसमोर गाडी थांबवली. त्या मुलाला बाहेर काढून लगेच आत नेण्यात आलं. मी खाली उतरलो. गाडीत पाहिलं तर रक्ताचे डाग सीटभर लागलेले. आता गाडी धुवून मगच क्लीनिकमध्ये गेलं पाहिजे !
मी कापडाने मोठमोठे डाग पुसून घेतले. गाडी वळवण्यासाठी गाडी स्टार्ट करणार इतक्यात ते पोलीस बाहेर आले.
“थॅंक यू बरं का!….तुम्ही होता म्हणून पोरगं वाचलं!” माझ्या गाडीतून आलेला तो वयस्कर पोलीस बोलला.
“त्यात थॅंक यू काय?….हे तर करायलाच लागतंय की !” मी म्हटलं.
“तरीही वेळ देणं महत्वाचं आहेच की !….जावा साहेब, आम्हांलाही आता जावं लागेल….अर्जंट काम आहे म्हणून एस पी ऑफिसला जात होतो तर हे घडलं…..आता कपडे बदलून जायचं म्हटल्यावर आणि तासभर लागणार.”
“तुम्ही चाललात? ….आणि मुलाजवळ कोण?”
“त्याच्या घरचे लोक येतील की!….त्याच्या मित्रानं सांगितलंय त्यांना फोन करून.”
“म्हणजे हा तुमचा मुलगा नाही?”
“नाही हो!” तो हसला, “माझ्या पुढं गाडीवरून जात होता एवढंच. मला त्याची काहीच माहिती नाही.”
“तुम्ही एवढं घाबरला होतात, त्याच्यासाठी एकसारखी देवाची प्रार्थना करत होतात म्हणून मला वाटलं तो तुमचा मुलगाच आहे !” मी म्हटलं.
“तसं बघायला गेलं तर तो माझा मुलगाच आहे. डॉक्टर आणि पोलीस हे जनतेचे मायबापच असतात की ! लोकांना वाचवणं त्यांचं कामच असतं!…या अर्थानं मी सगळ्यांचाच बाप आहे!”
तो हसत हसत गाडीवर बसला आणि निघूनही गेला. मी मात्र उगीचच त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत होतो !
डॉ.अशोक माळी,
साईनंदन पार्क, मिरज.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *