👁 10 Views

‘जय महाराष्ट्र’ घुमणारच!


‘जय महाराष्ट्र’


प्रतिनिधी
कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्राचा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी इशारा दिला आहे. यामुळे सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे. सीमाभागातील मराठी लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेतून कोणत्याही कारवाईची पर्वा न करता जय महाराष्ट्रचा नारा यापुढेही घुमतच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.  जय महाराष्ट्र ही सीमावासीयांच्या दृष्टीने केवळ घोषणा नसून ती एक ऊर्जा आहे. त्यामुळे मराठी माणसांना डिवचण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे सुनावण्यात येत आहे.
सीमाभागातील मराठी जनता मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा जपण्याचा जीवापाड प्रयत्न करते. यासाठीच भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्‍नाचा यज्ञ प्रज्वलित केला आहे. त्यामध्ये लाठ्या-काठ्या खाऊन प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा लढा धगधगता ठेवला आहे. घरादारावर तुळशीपत्र ठेवून लढ्यात शेवटपर्यंत एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते सीमाभागातील प्रत्येक गावातील घराघरांतून आढळून येतील. कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी केवळ मायमराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यात जाण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन लढ्यामध्ये सहभाग घेतला आहे.
सीमाभागातील मराठी माणसाला महाराष्ट्र आणि मराठी याबाबतची माहिती करून द्यावी लागत नाही. जन्मापासूनच प्रत्येकाच्या नसानसात  महाराष्ट्र प्रेम ओसंडून वाहते. जय महाराष्ट्राचा जयघोष उमटला म्हणजे त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्यांच्या रक्ताला उकळी फुटते. इतके महाराष्ट्र पे्रम येथील जनतेच्या मनामनात भिनलेले आहे. त्यामुळे नगरविकास मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याने सीमाभागात संतापाची लाट पसरली आहे. 
कर्नाटक सरकारच्या आगामी विधीमंडळ अधिवेशनात याबाबत दुरुस्ती विधेयक मंजुरी करण्यात येणार असल्याची त्यांनी वल्गना केली आहे. त्यानंतर नगरविकास खात्याच्या कायद्यात बदल करून जय महाराष्ट्र म्हणणार्‍या मराठी लोकप्रतिनिधींची निवड रद्द करण्याचा कायदा पारित केला जाणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रात जाण्याच्या एकाच ध्येयाने पछाडून कार्यरत असणार्‍या मराठी लोकप्रतिनिधींवर गंडांतर येणार आहे. सरकारच्या या कुटिल कारस्थानाविरोधात मराठी भाषिकाकडून दंड थोपटण्यात आले आहेत.
सीमावासीयांचा लढा भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सुरू आहे. हा प्रदेश मराठी भाषेच्या महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात यावा, अशी या भागातील मराठी जनतेची मागणी आहे. यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करून मागणी रेटून धरलेली असून लोकशाहीप्रणालीमध्ये उपलब्ध असणारे सर्व लढे हाती घेतले. मोर्चा, आंदोलन, सत्याग्रह, धरणे, रास्तारोको, निवेदने, अर्ज विनंत्या यांचा वापर करण्यात आला. 
मराठी जनतेची मागणी निवडणुकीच्या माध्यमातून मांडण्यासाठी निवडणुकादेखील लढविल्या गेल्या. त्या प्रचंड मताधिक्याने जिंकल्या. मात्र त्याची दखल लोकशाहीतील कोणत्याही सत्ताकेंद्राने घेतली नाही. यामुळे खचून न जाता हा लढा महाराष्ट्र सरकारच्या सहाय्याने 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला असून त्याठिकाणी हा लढा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला आहे. यामुळे कर्नाटक सरकार चेकाळले आहे. मराठी माणसाला डिवचण्यासाठी त्यांच्याकडून उपद्व्याप केले जात आहेत.
येळ्ळूर गावच्या वेशीत मोठ्या दिमाखात अनेक वर्षापासून उभा असलेला महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक बळाचा वापर करून हटविला. त्यावेळी फलक हटविण्यास विरोध करणार्‍या मराठी भाषिकांना बदडून काढण्यात आले. घराघरांत घुसून मराठी भाषिकांना अमानुषपणे मारले. घरांचे दरवाजे मोडले. जनावरांनादेखील मारहाण केली. इतक्या पाशवीपणे त्यांनी मराठी जनतेवर अत्याचार केले.
मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद सीमाभागात उमटत आहेत. निषेध व्यक्त केला जात आहे. मराठी जनतेला डिवचण्यासाठी याप्रकारचा खटाटोप कर्नाटक सरकारने करू नये. सरकारने याप्रकारचा कायदा केल्यास आपल्याला कोणत्याही पदाची आशा नसून जय महाराष्ट्र म्हणतच राहू, अशी भूमिका घेतली जात आहे. यामुळे येत्या काळात हा निषेधाचा वणवा अधिक तीव्र बनणार असल्याचे दिसून येत आहे. आजवर ग्रामपंचायत, तालुका पंचायत , कृषी उत्पन्न बाजार समिती, महानगरपालिका, नगरपालिका यामध्ये मराठी लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्रात विलीन होण्याचा ठराव बहुमताने संमत केला आहे. त्याची सल कर्नाटक सरकारला सातत्याने टोचत आहे. यातूनच बेळगाव आणि खानापूर तालुका पंचायतच्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. बेळगाव मनपा बरखास्त केली होती.
कर्नाटक सरकारचे हे सारे उपद्व्याप घटना विरोधी असून घटनेने दिलेल्या अधिकारावर घाला घालणारे आहेत. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार आहे. या प्रकारामुळे कायद्याची पायमल्ली होणार असून संकुचितपणा वाढीस लागणार आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *