👁 13 Views

शेतकऱ्यांच्या संपामुळे मी अस्वस्थ- शरद पवार

सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे

राज्यातील शेतकऱ्यांनी गुरूवारपासून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. संबंध देशात आणि महाराष्ट्रात बळीराजा संकटात आला असून रस्त्यावर उतरला आहे.तो त्याच्या प्रश्नासाठी संघर्ष करत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय आहे. ही संपूर्ण परिस्थिती मला अस्वस्थ करते, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असेही सांगितले. सरकारने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, त्यांना सन्मानाने जगण्यासाठी सरकार सोबतच जनतेनेही पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे राज्य आणि देशातील राज्यकर्त्यांनी शहाणपणाचा निर्णय लवकर घ्यावा आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचं राज्य आणावं अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कृषी व पणनमंत्री राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आव्हान केले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देत आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारशी मंगळवारी झालेली अंतिम टप्प्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आजपासून शेतकरी संपावर गेले आहेत. त्यानुसार आज सकाळपासून शेतकऱ्यांनी आक्रमक होत पुणे-बंगळुरू मार्गावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रक अडवले. शिर्डीत शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले. नाशिकसह मनमाड बाजार समितीतही शुकशुकाट पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले. साताऱ्यात या संपाची पहिली ठिणगी पडली. काल रात्रीच दूध वाहतूक करणाऱ्या दोन टँकरच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. मनमाड टोलनाक्यावर भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला. संपाच्या पार्श्वभूमीवर सातारा-पुणे महामार्गावर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. लासलगाव येथे पोलिसांनी आठ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. या संपाचे परिणाम पुणे आणि नवी मुंबई बाजार समितीत जाणवले. पुण्यात ५० टक्केच शेतीमालाची आवक झाली. तर नवी मुंबईतील वाशीत केवळ ५०० ट्रक शेतमालाची आवक झाली. संगमनेरजवळ शेतकऱ्यांनी २५ गाड्या रोखून धरल्या होत्या. नाशिक, नगर, साताऱ्यातील आठवडा बाजार बंद होते. सोलापूर बाजार समितीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत ट्रकचालकांना फुले देऊन संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. सोलापुरातील सांगोला येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले होते. बारामतीतही आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. राज्यातील अनेक दूध संकलन केंद्रांवर संपामुळे दूध संकलन करण्यात आले नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी शेतकरी संपाला गालबोट लागले. औरंगाबाद बाजार समितीत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली. निफाडजवळ नैताळे येथे शेतकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. शिर्डी-खिर्डीगणेश येथे शेतमालाचा टेम्पो पेटवून दिला.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *