👁 12 Views

शेतकऱ्यांचा संप म्हणजे अराजकतेची सुरूवात, राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब: राजू शेट्टी

सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांनी संपावर जाणे ही राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. सरकारने अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. शेतकरी आता चिडलेला असून त्यांच्या मागण्यांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. हा संप म्हणजे अराजकतेची सुरूवात असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी यांनी आपल्या शिरोळ या गावी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचे सांगताना शेतकऱ्यांना शांततेत आंदेालन करण्याचे आवाहनही केले. राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांना आज संपावर जाण्याची वेळ आली आहे. ही शरमेची बाब आहे. सरकारने आता यावर विचार करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफराशी स्वीकाराव्यात, कर्जमाफी करावी, हमी भाव मिळावा हीच आमची मागणी आहे. त्या सरकारने मान्य कराव्यात. सरकाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. गरज नसताना माल आयात-निर्यात करायचा, कर वाढवायचा हे कसले धोरण, असा सवाल त्यांनी केला.
एकीकडे ‘मन की बात’मध्ये डाळीचे उत्पादन वाढवायला सांगायचे आणि दुसरीकडे उत्पादन झाल्यानंतर त्यांना दर द्यायचा नाही, याला काय म्हणायचे असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता विचारला.
दरम्यान, सरकार चर्चेसाठी तयार असून त्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. आम्ही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, शेतकऱ्यांनी सरकारबरोबर यावे असे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे राज्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन तीव्र केले असून अनेक ठिकाणी दूध, भाजीपाल रस्त्यावर फेकून दिले. औरंगाबाद येथे तर शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये वादावादी झाली. शेतकऱ्यांना पुण्या-मुंबईकडे जाणारे दुधाचे टँकर आणि भाजीपाल्याचे ट्रक रस्त्यावर अडवले आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *