👁 14 Views

देहू, आळंदी आणि पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पालखी सोहळा तयारी बैठकीत सूचना

            पुणे, दि. 3 – श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि देहू येथील त्याचबरोबर दोन्ही पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढून टाकावीत, अशा सूचना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरी बापट यांनी आज येथे दिल्या.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते,आमदार संजय भेगडे, आमदार सुरेश गोरे, आमदार मकरंद पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, जिल्हाधिकारी सौरभ राव, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे शहर पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह त्याचबरोबर श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले की, अवघ्या जगभरातून वारीसाठी भाविक आणि वारकरी येतात. त्यामुळे स्वच्छता, सुरक्षितता आणि शिस्तबद्धता या तीन महत्वाच्या मुद्यावर वारी आणि पालखी सोहळ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. वारीतील वाहतूक व्यवस्था अतिशय उत्तम असायला हवी. त्यासाठी देहू , आळंदी येथील त्याचबरोबर दोन्ही पालखीच्या मार्गावरील अतिक्रमणे संबंधित यंत्रणांनी काढून टाकावीत. त्यामुळे पालखी मार्ग मोकळा होईल आणि वारकरी आणि भाविक यांना वारीच्या काळात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.
वारीच्या कालावधीत स्वच्छता राहील आणि वारकऱ्यांना पाण्याची उपलब्धता राहील याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या पॅटर्नची सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती घ्यावी आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
वारीत सहभागी होणाऱ्या दिंडींना गॅस सिलींडर आणि केरोसीनचा पुरवठा वेळेत व्हावा, यासाठी आवश्यक त्या बाबींची पुर्तता केली जावी. सिलींडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असावेत, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली.
दोन्ही पालखींचा मुक्काम असणाऱ्या ठिकाणी वीज पुरवठा अखंडीत राहावा यासाठी तीनही जिल्हाधिकारी यांनी आप आपल्या कार्यक्षेत्रात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. पाणी पुरवठ्यासाठी शासकीय टँकर उपलब्ध करून द्याव्यातच त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत कोठे आहेत, याची माहिती दिंडी प्रमुखांना द्यावी, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. याबाबत वारंवार बैठका घेतल्या जात आहेत. येत्या आठवड्यातही बैठक घेतली जाणार असून आज संबंधित संस्था आणि पालखी सोहळा प्रमुख यांनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीबाबत प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. पंढरपूर येथे आढावा बैठक घेण्यात आली असून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले.
बैठकीत पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सोलापूर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आपल्या जिल्हयातील पालखी सोहळ्याच्या तयारीबाबातचे सादरीकरण केले. बैठकीस पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील महसूल, जिल्हा परिषद, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी सोहळ्यासाठीच्या
मोबाईल ॲपचे अनावरण
पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपचे् पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले. या ॲपमध्ये पालखी सोहळ्याचे व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना अशा तीन विभागातील माहिती संकलित करण्यात आली आहे. यापुर्वी प्रशासनातर्फे पालखी सोहळ्यासाठी संपर्क क्रमांकाची डायरी तयार केली जात होती. त्याऐवजी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. पण प्रशासनातर्फे डायरीही प्रकाशित केली जाणार आहे. हे ॲप 12 जून 2017 पासून मोबाईलवर डाऊनलोड करता येणे शक्य असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *