👁 12 Views

सुवासिनींचे वडलागवडीचे व्रत

भविष्यातील पिढय़ांसाठी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा ही त्यामागची भावना आहे.


एकीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वटवृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, तर दुसरीकडे धावपळीच्या दिनचर्येत वडाचे झाड शोधण्यापेक्षा त्याची फांदी घरी आणून पूजन करण्याचे कर्मकांड महिलांमध्ये बोकाळले आहे. वटपौर्णिमेच्या पारंपारिक सणामागच्या निसर्गस्नेही उद्देशालाच हरताळ फासणाऱ्या या प्रवृत्तीला लगाम बसावा या हेतूने कल्याणमधील महिलांनी गुरूवारी वटपौर्णिमेनिमित्त शहर परिसरात नव्या वटवृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
नितिशा वैद्य या कल्याणमधील ओक हायस्कूलमध्ये शिकलेल्या माजी विद्यार्थिनीने या उपक्रमात पुढाकार घेतला असून शाळेतील इतर माजी विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. जुन्या कल्याणमध्ये आता जेमतेम दोनच वटवृक्ष असून परिसरातील हजारो महिला वर्षांनुवर्षे त्यांनाच धागे बांधतात. सर्वात जास्त ऑक्सिजन देत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने वडाच्या झाडाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. त्यामुळे यंदा वटपौर्णिमेनिमित्त कल्याणमध्ये नव्या वटवृक्षांची लागवड करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला. सुभाष मैदान, वासुदेव बळवंत फडके मैदान, आधारवाडी, वायलेनगर, लालचौकी, दुर्गाडी, गणेशघाट या सात ठिकाणी प्रत्येकी सात वडाची रोपे लावण्यात येणार असून त्यांचे संगोपनही केले जाणार आहे. भविष्यातील पिढय़ांसाठी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा ही त्यामागची भावना आहे.
शहरी विभागातील वटवृक्षांची संख्या झपाटय़ाने कमी होऊलागली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे विकास योजनेत अडसर ठरणारी ही झाडे तोडून टाकली गेली. रस्ता रूंदीकरणातही अनेक वटवृक्षांना आपले प्राण गमवावे लागले. या पाश्र्वभूमीवर वटपौर्णिमेच्या निमित्ताने  हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *