👁 15 Views

सत्य दडपले जाऊ शकत नाही, हे हिंदुस्थान समाचारने सिद्ध केले

– सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन
– संस्थेच्या विदर्भ कार्यालयाचा थाटात शुभारंभ
नागपूर, ९ जून
सत्य हे कधीच दडपले जाऊ शकत नाही. ते बीजरूपात जिवंत असते आणि कधी ना कधी त्या बीजाला अंकुर फुटत असतात. हे हिंदुस्थान समाचार या संस्थेने सिद्ध करून दाखविले आहे. दडपशाहीमुळे ही संस्था लयाला गेली होती. मात्र, त्याच्या सत्याची बीजे स्वयंसेवकांच्या मनात कायम होती. संस्थेला कॉंग्रेसच्या शासन काळात चारही बाजूंनी पंगू करण्यात आले होते. मात्र, स्वयंसेवकांच्या मनातील बीजाला अंकुर फुटले आणि आज ही संस्था पुन्हा एकदा प्रगती करू लागली आहे. हळूहळू ही संस्था आशियातच नव्हे तर विश्‍वात आपले नाव गाजवेल, असा विश्‍वास सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आज येथे व्यक्त केला.
शंकरनगरस्थित महाबँक एटीएमच्या वरच्या मजल्यावर हिंदुस्थान समाचार विदर्भ विभागाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते विधिवत् करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. हिंदुस्थान समाचार बहुराज्यीय सहकारी समितीचे अध्यक्ष खा. रवींद्र किशोर सिन्हा समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. समितीचे उपाध्यक्ष जगदीश उपासने व ज्येष्ठ पत्रकार अच्युतानंद मिश्र याप्रसंगी व्यासपीठावर विराजमान होते.
कणखर बाण्याच्या या वृत्तसंस्थेचे अस्तित्व आणिबाणीच्या काळापासून संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, नव्हे त्यात दडपशाही करणारे यशस्वीही झाले होते. दरम्यान, श्रीकांतजी जोशी यांच्या मनात या संस्थेच्या पुनरुज्जीवनाचा विचार आला आणि संस्थेने पुन्हा एकदा नवीन उभारी घेतली, असे सांगून सरसंघचालक म्हणाले की, आज भारताच्या मूळ असलेल्या वृत्तसंस्था नाही, त्यातही बहुभाषी अजीबात नाही. ज्या संस्था आहेत त्याही भारताचा दृष्टिकोन समोर ठेवून लिखाण करीत नाहीत. त्यामुळे भारताचा दृष्टिकोन सर्वांना त्यांच्या भाषेत कळावा या उद्देशाने ही संस्था कार्य करीत आहे. उर्दू, नेपाळी भाषेतही या संस्थेतर्फे वृत्त दिले जात आहे. ही संस्था नव्याने उभी करायला खूप परिश्रम घ्यावे लागले आहेत. आज ही संस्था समर्थपणे उभी झाली आहे.
सद्य:स्थितीत व्यापारी वृत्ती वाढत चालली आहे. त्याचे कुटुंबांवरही परिणाम होताना दिसत आहेत. त्याला प्राधान्य दिले जात असल्यामुळे मूल्यांचा र्‍हास होत आहे. अर्थकारणाने धर्माला मागे टाकले आहे. आधी वृत्तपत्र जगत हे आधी समाज जगत, नंतर प्रचार जगत आणि आता संवाद जगत म्हणून ओळखले जात आहे. संवादात विवाद नसावा, स्वार्थसिद्धीसाठी तर तो नसावाच. संवाद हा प्रबोधन आणि तत्त्वबोधासाठी व्हायला हवा. उगाच एखाद्या विषयाची सनसनी पसरवून प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ मिळविले जातात. अशा परिस्थितीत वृत्ताचे मूल्य योग्य पद्धतीने ठरविले गेले पाहिजे, अशी अपेक्षाही सरसंघचालकांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात खा. सिन्हा म्हणाले की, हिंदुस्थान समाचार या आमच्या बहुभाषीय वृत्तसंस्थेने चांगली प्रगती केली आहे. युएनआय या वृत्तसंस्थेला आम्ही मागे टाकून पीटीआय या अन्य एका वृत्तसंस्थेच्या बरोबरीत आम्ही आलो आहोत. पीटीआयच्या तुलनेत आमच्या संस्थेद्वारे दुप्पट वृत्त दिले जाते.
देशातील भाषिक वृत्तपत्रांमध्ये हिंदुस्थान समाचारची लोकप्रियता वाढत आहे. २८ राज्यांमध्ये आमच्या संस्थेचे ब्युरो ऑफिस असून अमेरिका व इतरही काही देशांत आमचे प्रतिनिधी आहेत. तेथे जपल्या जाणार्‍या भारतीय संस्कृतीच्या वृत्तांकनावर आमचा जास्त भर असतो, असे सांगून सिन्हा यांनी हिंदुस्थान समाचारवर आलेले संकट आणि त्यातून सावरण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
मुख्य संपादक व मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश मंजुल यांनी प्रास्ताविक केले, तर विदर्भ विभागाचे संचालक अरविंद मार्डीकर यांनी शेवटी आभार मानले. प्रा. विवेक अलोणी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. महानगर संघचालक राजेश लोया, महापौर नंदा जिचकार, माहिती आयुक्त दिलीप धारूरकर, खा. अमर साबळे, आ. आशिष देशमुख यांच्यासह समितीचे सर्व संचालक व अनेक गणमान्य या समारंभाला आवर्जून उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *