👁 10 Views

देशात खर्‍या विकासपर्वाला प्रारंभ

एम. जे. अकबर यांचे प्रतिपादन

– नागरिकांची स्वप्ने पूर्ण होणार
नागपूर, १४ जून
तीन वर्षांपूर्वी सबका साथ सबका विकास हा नारा आला होता. आज हा नारा देशाच्या कानाकोपर्‍यात पोचला असून, प्रत्येक नागरिकाच्या ओठावर आहे. आपला खरेच विकास होईल का, असा प्रश्‍न देशवासीयांच्या मनात मागील ६८ वर्षांपासून कायम होता. मात्र २०१४ मध्ये एक इतिहास घडला आणि यातून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आले. या सरकारचे ध्येच मुळी देशच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचा विकास हेच होते. या ध्येयसिद्धीसाठी सरकारची पावले पडत आहेत. नागरिकांच्याही मनात विश्‍वास निर्माण झाला आहे. देशात खर्‍या विकासपर्वाला प्रारंभ झाला आहे, असे ठाम प्रतिपादन परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी केले.
वेस्टर्न कोलफील्ड्‌सतर्फे बुधवारी सायंकाळी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सबका साथ सबका विकास संमेलन आयोजिण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एम. जे. अकबर बोलत होते. व्यासपीठावर खा. डॉ. विकास महात्मे, महापौर नंदा जिचकार, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. नागो गाणार, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, वेकोलिचे संचालक (टेक्निकल) बी. के. मित्रा, संचालक (पर्सोनेल) संजयकुमार, स्टिअरिंग कमिटीचे सदस्य सौरभ दुबे उपस्थित होते.
‘सबका साथ, सबका विकास’ या वाक्यामधील ‘सब, साथ, विकास’ या तीन शब्दाचा अर्थ सर्व समाजघटक, लोक-सहभाग व देशाचा सर्वांगीण विकास असा अभिप्रेत असून, या शब्दांमध्येच विकासाची त्रिसूत्री सामावलेली असल्याचे एम. जे. अकबर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत प्रथम केलेल्या भाषणात गरिबी कमी करण्याऐवजी ती नष्टच करण्यावर भर दिला होता. प्रगतीचा, विकासाचा पहिला हक्क हा गरिबांचा आहे. या भावनेतूनच ‘सब’ म्हणजे सर्व समाजघटकांचा विकास हे केंद्र शासनाने आपले ध्येयच ठरविले आहे. ६८ वर्षांत प्रथमच बँकेच्या इतिहासात पैसे नसणार्‍या निर्धन लोकांना बँकेत खाते उघडण्याची सुविधा मिळाली आहे. बँकेचे व्यवहारही आधार व मोबाईल क्रमांकाच्या जोडणीमुळे पारदर्शक झाले आहे. गेल्या ६८ वर्षांत गरिबांना बँकेत खाते उघडण्याची हिंमतच मुळी होत नव्हती. ती हिंमत मोदींच्या नेतृत्वातील सरकारने दिली आहे. विकासाकरिता केवळ केंद्र शासनालाच कार्य करावे लागेल असे नसून विकासकार्यासाठी लोकसहभाग म्हणजेच साथ सुनिश्‍चित करणे आवश्यक आहे, असेही अकबर यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन एस. पी. सिंग यांनी केले. सौरभ दुबे यांनी आभार मानले.
येणारी निवडणूक तिसरी ऐतिहासिक निवडणूक ठरेल
गेल्या तीन वर्षांच्या मोदी सरकारच्या एकूणच कामामुळे देशवासीयांत नव्या विश्‍वासाने जन्म घेतला आहे. १९५२ ची पहिली निवडणूक आपल्यासाठी ऐतिहासिक होती. कारण लोकशाही प्राणालीचे ते पहिले पाऊल होते. १९७७ मध्ये झालेल्या निवडणुकीत कोणतेही सरकार लोकशाहीची गळचेपी करू शकत नाही हे सिद्ध झाल्याने दुसरी ऐतिहासिक निवडणूक ठरली होती. गेल्या तीन वर्षांत देशाला गरिबीमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणारे विश्‍वासार्ह वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही तिसरी ऐतिहासिक निवडणूक ठरेल, असेही अकबर यांनी सांगितले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *