शहरातील अनेक ठिकाणी थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा सुरू आहे.तेल लावून गुडघे,पोटऱ्या,तळवे,बोटे यांना शास्त्रशुद्ध मालिश किंवा मसाज करण्यात येत आहे.
पुणे – पंढरपूरला श्रीविठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेला वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत विसावला हाेता. रविवारी सायंकाळपासून पालखी साेहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकर रमले आहेत. विविध संस्था, संघटना, ट्रस्ट, मंदिरे, राजकीय पक्ष आणि व्यक्तिगत पातळीवरही वारकऱ्यांमध्येच विठ्ठलाचे रूप कल्पून त्यांच्या सोयी-सुविधांसाठी झटत आहेत.
रविवारी सायंकाळी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांच्या पालख्या दोन दिवसांच्या विसाव्यासाठी पुण्यात दाखल झाल्या तेव्हापासून आळंदी-पुणे वाटचालीचा श्रमपरिहार करण्यासाठी पुणेकर प्रयत्नशील आहेत. संपूर्ण वारीमार्गावर आळंदी-पुणे आणि पुणे-सासवड हे दोनच टप्पे दीर्घ पल्ल्याचे आहेत. त्यामुळेच पालख्या पुण्यात दोन दिवस विसावा घेतात. मंगळवारी सकाळी दोन्ही पालख्या हडपसरमार्गे प्रयाण करतील.
वारकऱ्यांसह इफ्तार
साखळीपीर मंदिर आणि दि मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टतर्फे मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांसह एकत्रित रमजान महिन्याचा उपवास सोडला. अनेक वारकऱ्यांनी मुस्लिम बांधवांसह एकत्रित येऊन संवाद साधला व भेटीचा आनंद साजरा केला.
फक्त धार्मिक अधिष्ठान सरले
वारीचा हेतू आध्यात्मिक उन्नतीचा असला तरी नव्या काळात वारीला समकालीन संदर्भही जोडले गेले आहेत. निर्मल वारी, हरित वारी, प्रदूषणमुक्त वारी, ‘ती’ची वारी.. असे अनेक उपक्रम वारीत सहभागी झाले अाहेत.
भोजन, चहा, नाष्ट्याचीही साेय
शहरातील अनेक ठिकाणी थकलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा सुरू आहे. तेल लावून गुडघे, पोटऱ्या, तळवे, बोटे यांना शास्त्रशुद्ध मालिश किंवा मसाज करण्यात येत आहे. तरुणाई यात आघाडीवर आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ वारकऱ्यांना हेडमसाज देण्यात येत आहे. शहरातील प्रत्येक मंदिरात वारकऱ्यांसाठी भोजन, चहा, नाष्टा, फलाहार आणि पाणपोया उपलब्ध करण्यात आल्या आहेत. वारीतील वाहनांची संख्या मोठी आहे, परंतु वाहनतळही मोफत करण्यात आले आहेत. मोठ्या सोसायट्यांमध्ये एकत्रित स्वरूपात सोसायटीच्या आवारात मंडप घालून वारकऱ्यांसाठी भोजनादी सोयी केल्या आहेत.
सर्व धर्म समभाव…
साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने सालाबाद प्रमाणे पांडुरंगाच्या प्रसादाने, भजनाच्या गजरात, सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत मुस्लिमांचा रोजा ईफतारचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी सर्व धर्म ग्रंथांचे पुजन व सोबत राष्ट्र ग्रंथ संविधानाचेही पुजन करण्यात आले.


















