👁 9 Views

भुजबळांच्या 300 काेटींच्या मालमत्तेवर टाच, प्राप्तिकर विभागाने दिली जप्तीची नोटीस

मुंबई – सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात प्राप्तिकर विभागानेही मोठी कारवाई करत भुजबळ कुटुंबीयांच्या मुंबई, नाशिक आणि रायगड येथील जवळपास ३०० कोटींच्या मालमत्तेवर नव्याने लागू झालेल्या बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायदा २०१६ अन्वये टाच आणली.
भुजबळ कुटुंबीयांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावलेला पैसा ४४ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून विविध मालमत्तांमध्ये गुंतवल्याचा आयकर विभागाचा आरोप आहे. प्राप्तीकर विभागाने बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्याच्या नियम २४(३) अन्वये बेनामी संपत्ती निर्माण केल्याप्रकरणी छगन भुजबळांवर मालमत्ता जप्तीची नोटीस बजावल्याने भुजबळांच्या अडचणी वाढल्या आहेत. या कारवाईत भुजबळांच्या नाशिक, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतील २२३ कोटींच्या मालमत्तेवर टाच आली असून बाजारभावाने या संपत्तीची किंमत ३०० कोटींच्या घरात असल्याचा प्राप्तीकर विभागाचा दावा आहे. दरम्यान, या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास दोषींना सात वर्षांचा सश्रम कारावास आणि जप्त केलेल्या मालमत्तेच्या बाजारभावानुसार एक चतुर्थांश रकमेइतक्या दंडाची शिक्षा होऊ शकते.
नाशिक येथील गिरणा हा कारखाना सध्या आर्मस्ट्राँग इन्फ्रा प्रा.लि. या कंपनीच्या नावे नोंदवण्यात आला असल्याची माहिती प्राप्तीकर विभागातील सूत्रांनी दिली. भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या कंपन्यांमध्ये तब्बल ४४ बोगस कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचा पैसा गुंतवण्यात आल्याची बाब प्राप्तीकर विभागाच्या प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाल्याचे समजते.
कोलकाता आणि मुंबईस्थीत या बोगस कंपन्यांच्या माध्यमातून भुजबळ कुटुंबियांच्या मालकीच्या कंपन्यांत गुंतवल्या गेलेल्या रकमेचे कोणतेही अधिकृत स्रोत चौकशी पथकाला आढळून आले नाहीत. या व्यवहारांबाबत कोणताही समाधानकारक खुलासा भुजबळ कुटुंबियांना करता आला नसल्याचेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सध्या भुजबळ सक्तवसुली संचालनालयाद्वारे अटक होऊन न्यायालयीन कोठडीत असून ईडीच्या चौकशीदरम्यान भुजबळांनी दिलेला जबाब हा या नोटीशीसाठी ग्राह्य मानण्यात आला आहे. दरम्यान २५ नोव्हेंबर २०१६ रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळांच्या बेनामी मालमत्तेबाबतची तक्रार बेनामी व्यवहार (प्रतिबंध) कायद्यानुसार कारवाईचे अधिकार असलेल्या महासंचालक (चौकशी)कार्यालयाकडे केली होती. या महासंचालकांच्या आदेशानंतर प्राप्तीकर विभाग भुजबळांच्या प्रत्यक्ष जप्तीच्या कारवाईला सुरूवात करेल.
हा तर बदनामीचा डाव, भुजबळांचा दावा 
भुजबळ कुटुंबीयांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईबाबतचे वृत्त निराधार अाहे. आयकर विभागाकडून महिन्याभरापूर्वी नोटीस प्राप्त झाली असून त्यावर संबंधित विभागासमोर अंतरिम उत्तरही देण्यात आले आहे. संबंधित मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून अगोदरच जप्त करण्यात आली असून उर्वरित काही मालमत्तांवरील कारवाईला विशेष पीएमएलए लवादाने स्थगिती दिली आहे. नव्याने कोणतीही जप्तीची कारवाई झाली नाही. हा भुजबळ कुटुंबीयांची बदनाम करण्याचा व जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे, असा खुलासा भुजबळांच्या जनसंपर्क यंत्रणेच्या वतीने करण्यात आला आहे.


या आहेत मालमत्ता
– नाशिक येथील ८१ कोटी रुपये किमतीचा गिरणा साखर कारखाना.
– साडेअकरा कोटी रुपये किमतीची मुंबईतील सांताक्रूझ परिसरातील सॉलीटेअर ही बहुमजली रहिवासी इमारत.
– परवेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या बांधकाम व्यवसाय कंपनीच्या ४४ कोटींच्या वांद्रे येथील हबीब मनोर आणि फातेमा मनोर या दोन इमारती.
– अंदाजे ८८ कोटींच्या आसपास किंमत असलेला रायगड जिल्ह्यातील पनवेल परिसरातील भूखंड.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  

















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *