पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 31 July 2017
जालन्यात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार
अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा बँकेसमोर रांगेत उभ्या शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
हिंगोली जिल्ह्य़ात रविवारी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अशी जिवघेणी कसरत केली.
बहुतांश ठिकाणी सुट्टीच्या दिवशीही बँकांपुढे रांगा
मराठवाडय़ात रविवारी प्रत्येक जिल्ह्य़ात पीकविमा भरण्यासाठी बँका सुटीच्याही दिवशी सुरू ठेवल्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी ठिकठिकाणच्या जिल्हा मध्यवर्ती, महाराष्ट्र ग्रामीण बँकासह स्थानिक इतर बँकांच्या शाखेसमोर सायंकाळपर्यंत रांगेत उभे राहून पीकविमा भरला. शनिवारी नांदेड जिल्ह्य़ात रांगेत उभ्या असलेल्या एका शेतकऱ्याचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाला होता. रविवारी जालन्यातील जामखेड येथे शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर एका पोलिसाकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. एवढी घटना वगळता इतर सर्व जिल्ह्य़ात पीकविमा भरताना कुठलीही अनुचित घटना घडली नाही. परभणीत पोलीस बंदोबस्तातच पीकविमा भरण्यात आला.
बीडमध्ये पीकविमा भरण्यासाठी केवळ एक दिवस उरल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशीही सर्व बँका हाऊसफुल्ल होत्या. बँकांबाहेरही शेतकऱ्यांच्या लांबचलांब रांगा दिसून आल्या. दैनंदिन वेळेत चार वाजेपर्यंत पीकविमा स्वीकारला जात असताना रविवारी मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीकविमा स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले होते. शनिवापर्यंत सरासरी सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. सर्वच बँकांमध्ये रांगेत उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. गरज पडल्यास शेतकऱ्यांना अल्पोपहार द्यावा, असे वरिष्ठांचे आदेश होते. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पीकविमा भरुन घेण्यात आला. दोन दिवसापूर्वी निर्माण झालेली किचकट परिस्थिती आणि तांत्रिक अडचणी रविवारी दूर झाल्या होत्या. दैनंदिन व्यवहार नसल्यामुळे सर्व बँक अधिकारी, कर्मचारी पीकविमा भरुन घेत होते. सोमवार, ३१ जुलै शेवटचा दिवस असल्याने बँकांवरील ताण आणखी वाढणार आहे.
जालना जिल्ह्य़ाच्या अंबड तालुक्यातील जामखेड येथील जिल्हा बँकेसमोर रांगेत उभ्या शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. एका पोलिसाने शेतकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. काही वेळानंतर पुन्हा सुरळीत प्रक्रिया सुरू झाली. परभणीत बहुतांश ठिकाणच्या बँकांच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात होता. उस्मानाबादेतही सायंकाळपर्यंत बँकांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा कायम होत्या. हिंगोलीत शेतकऱ्यांची बँकांपुढे एकच झुंबड उडाली होती. नांदेडमध्ये शनिवारी रामा लक्ष्मण पोतरे या शेतकऱ्याचा रांगेत उभे असताना भोवळ येऊन पडल्याने मृत्यू झाला. पोतरे कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही पोतरे कुटुंबीयांची भेट घेऊन जिल्हा काँग्रेसतर्फे ५० हजारांची मदत जाहीर केली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











