👁 9 Views

मराठीला राजभाषेचा दर्जा देणारे छत्रपती शिवाजी हे पहिले राजे होत- डॉ. विनया पाटील

Pandharpur Live-

पंढरपूर- “महाराष्ट्रसह देशावर अनेक परकिय सत्तांनी राजसत्ता गाजविली असली तरी मराठी भाषेने आपली अस्मिता टिकवून ठेवली. मराठी भाषा समृध्द करण्याचे कार्य संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी फार मोठ्या स्वरुपात केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेची अस्मिता व स्वाभीमान निर्माण केला. आपल्या राजकारभारात मराठी भाषेचा वापर करता यावा, यासाठी ‘राजभाषाकोश’ तयार करवून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक समाजधुरिणांनी ह्या भाषेच्या विकासात योगदान दिल्यानेच मराठी ही श्रेष्ठत्वापर्यंत जावून पोहचली आहे.” असे प्रतिपादन प्रा. डॉ. विनया पाटील यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते.
डॉ. विनया पाटील पुढे म्हणाल्या की, “मराठी भाषामध्ये प्रादेशिक बोली ह्या वैशिष्ट्यपूर्ण असून कोकणी, माणदेशी, खानदेशी, मराठवाडी, वैदर्भी, अहिराणी, डांगी आदी बोली भाषेने मराठी समृध्द बनली आहे. मराठी भाषा अधिकाधिक समृध्द होण्यासाठी वाचक चळवळ वेगवान बनली पाहिजे. लेखक-प्रकाशक-वितरक-वाचक हे नाते अधिक दृढ झाले तर वाचन चळवळीला वेग येईल. मराठी भाषेला वि. वा. शिरवाडकरांनी दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. मराठी भाषेवर आजवर खूप आक्रमणे झाली. ही सर्व आक्रमणे पचवून मराठी भाषेने आपले स्वरुप समृध्द केले आहे.”



अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “मराठी भाषा ही अतिशय सुंदर भाषा असून ती राजमान्यता पावलेली लोकभाषा आहे. वृत्त, अलंकार व छंदांनी ह्या भाषेच्या रचनेचे सौंदर्य अधिक विकसित होते. मराठी भाषेने अध्यात्मातील पावित्र्य, युध्दभूमीवरील शौर्य, राजकारणातील धुरिणत्व, सभेतील चातूर्य, मनातील गोडवा, मातीशी जिव्हाळा, संस्कृतीमधील वारसा, सौंदर्यातील लालित्य जपण्याचे काम केले आहे. समाज मान्य ठरलेल्या या भाषेला अजूनही अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होवू शकला नाही.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. राजाराम राठोड यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी लोकसाहित्य आणि मराठी साहित्याचे नाते यातील ऋणानुबंध स्पष्ट केला. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या अनुक्रमे सुरज शेख, अंबिका चांडोले व शबरी गानमोटे या विद्यार्थ्यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्री. गणपत शिंदे व दुर्गेश काळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास डॉ. रमेश शिंदे, डॉ. दत्तात्रय डांगे, विद्यार्थी, विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सुभाष कदम यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *