👁 14 Views

राज्यातील नेटकरी भाजपवर संतापले… मुख्यमंत्री मदतनिधी सोडून पीएम केअर्ससाठी मदतीचे आवाहन का?



पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना विरोधातील निकराने लढाई लढत आहेत. असे असतानाच राज्याला कोरोना विरोधातील लढ्याला प्रचंड निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरघोस निधी मिळत आहे. आतापर्यंत त्यामध्ये २५१ कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. तथापि, राज्यातील भाजप नेत्यांकडून पीएम केअर मदतीसाठी आवाहन केले जात आहे. त्यामुळे राज्यातील नेटकरी भाजपवर संतापले आहेत. मुख्यमंत्री मदतनिधी सोडून पीएम केअर्ससाठी मदत करण्यास का सांगितले जात आहे? हा प्रश्न अनेकजण विचारत आहेत.


राज्यात अनपेक्षितपणे सत्ता परिवर्तन झाल्याने भारतीय जनता पक्षातील नेत्यांची नाराजी लपून राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. राज्यावर सध्या कोरोना संकट आहे. त्यातही देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या महामुंबई कोरोनाचे गंभीर सावट आहे. देशात सर्वांधिक बाधित राज्यात आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील लढा एकीच्या वज्रमुठीने लढणे अपेक्षित आहे. 
आतापर्यंत फेसबुकवर भाजपचे जेवढे राज्यातील नेते लाईव्ह आले आहेत किंवा व्हिडिओ पोस्ट केला आहे, त्यावर नेटकरी प्रचंड तुटून पडून ट्रोल करत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही सुटलेले नाहीत. त्यांच्यासह सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशीष शेलार यांनाही ट्रोल करण्यात येत आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचंड ट्रोल झाले. माजी मंत्री विनोद तावडे यांनाही नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले.
माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना, तर आपुलकीचा संवाद डिलीट करावा लागला. यावरून ट्रोलची तीव्रता दिसून येते. त्यांनी फेसबुकवर आपुलकीचा संवादच्या माध्यमातून संवाद साधला, पण कमेंटमध्ये कमेंटचा धुमाकूळ सुरु झाला. त्यामध्ये शेकडो जणांनी फक्त हाहा रिॲक्ट करायला सुरुवात केली. कालांतराने हा आकडा वाढत गेल्यानंतर त्यांनी पोस्टच डिलीट करून टाकली.
राजकारण कशाला करता? भाजप नेत्यांवर राजू शेट्टीही संतापले
लॉकडाऊनमुळे महसूलाचे सगळे स्त्रोत बंद असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र राज्यातील भाजप नेत्यांनी पीएम फंडाला निधी जमा केला असून पीएम फंडाला मदत करण्याचं आवाहनही केलं आहे. भाजपच्या कृतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री फंडाला पैशांची गरज असताना भाजपचे नेते पीएम फंडाला पैसे द्या, असं सांगत आहेत. हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे. मुख्यमंत्री पदावर कोण आहे, हे बघण्यापेक्षा ते घटनात्मक पद आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे. पण भाजपवाले असल्या अडचणीच्या काळात सुद्धा सूडबुद्धीनं वागत आहेत.
सत्ता गेल्याचा राग अजून त्यांच्या मनातून गेलेला नाही, हे यातून दिसत आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे.

भाजपचे महाराष्ट्रातील नेते पोरकटपणे वागत आहेत. दोन महिन्यांनी एकमेकांच्या उरावर बसा, पण आता कशाला राजकारण करता? असा सवाल शेट्टी यांनी राजकीय पक्षांना केला आहे.
मुख्यमंत्री फंडाला दिलेली मदत उद्धव ठाकरे घरखर्चाला वापरणार नाहीत किंवा पीएम फंडाला दिलेली मदत पंतप्रधान घरी नेणार नाहीत, हे खरं असलं तरी आज महाराष्ट्र सरकारला पैशांची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि उद्योजकांनी मुख्यमंत्री फंडाला मदत करावी, असं आवाहन शेट्टी यांनी केलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *