👁 12 Views

राज्यातील दुकाने बंदच राहतील… व्यापा-यांचा हिरमोड… मुंबई -पुण्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढण्याची शक्यता


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- गेले महिनाभर लॉकडाऊनमध्ये असलेल्या जनतेला आता लॉकडाऊन संपण्याची प्रतीक्षा आहे. लोक आता लॉकडाऊन कधी संपणार, याची वाट पाहत आहेत. विशेषत: कष्टकरी, अंगमेहनतीचे काम करणारे व रोजीरोटी कमावणार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, सरकारला जनतेच्या जीविताची काळजी असल्याने राज्य सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत दुकाने बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.   
लॉकडाऊनमधील बंधने आता हळूहळू शिथिल केली जात असून, रविवारपासून जीवनावश्यक वस्तूंखेरीज अन्य दुकाने काही अटींवर उघडण्याची मुभा केंद्र सरकारने दिली असली, तरी राज्य सरकारने मात्र तसे करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता सध्या तरी अशी परवानगी देता येणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचा हिरमोड झाला आहे.

सर्वाधिकार राज्याला : टोपे
केंद्र सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायची की नाही, यावर अद्याप विचार सुरू आहे. याबद्दलचा सर्वाधिकार राज्याचा आहे, असे टोपे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या तरी दुकाने उघडणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.
राज्यात काही दुकानांना सशर्त परवानगी
महाराष्ट्र सरकारने आधीच राज्यातील कंटेनमेंट झोन नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, गर्दी कमी होत नसल्याने तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबई, पुण्यातील सवलत अवघ्या एका दिवसात रद्द करण्यात आली होती. या दोन्ही शहरांत मान्सूनपूर्व कामे करण्यास तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि पंख्याची तसेच पुस्तकांची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणार्‍या सेवा, बेकरी, दूध प्रक्रिया केंद्र, पिठाची गिरणी सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.
घरगुती उपकरणांची दुरुस्ती करणार्‍या लोकांनाही काम करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली होती. आता अन्य दुकानांनाही परवानगी देणारा आदेश गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा काढला. मात्र, केंद्राचा हा आदेश राज्य सरकारने नाकारला असून, सध्या तरी दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे म्हटले आहे.

देशातील लॉकडाऊन हळूहळू कमी करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असताना दुसरीकडे मात्र मुंबईसह ठाणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव सुरूच असल्याने या क्षेत्रातील लॉकडाऊन ३ मे नंतरही सुरूच ठेवण्याची सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केली आहे. परिणामी राज्यातील लॉकडाऊनबाबत जरी ३ मे नंतर ग्रामीण भागाला दिलासा मिळू शकणार असला तरी मुंबई, पुणे, व ठाणे जिल्ह्याला मात्र लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्य पथकाने मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्याची पाहणी केल्यानंतर येथील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची सूचना राज्य व केंद्र सरकारला केली आहे.

त्यामुळे हा भाग वगळता राज्यातील अन्य भागातील लॉकडाऊन उठवण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते. मात्र, जो विभाग रेड झोनमध्ये दाखवण्यात आला आहे तसेच कंटेन्मेंट झोन ज्या भागात आहे तेथील लॉकडाऊन ३ मे नंतरही उठण्याची शक्यता नाही, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशात येणारा संपूर्ण ठाणे जिल्हा तसेच पालघर व रायगड जिल्ह्यातील एमएमआरडीएच्या क्षेत्रात येणार्‍या भागालाही वाढीव लॉकडाऊन लागू असेल. साधारणपणे मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश या कार्यक्षेत्रात येणार्‍या सर्वच भागांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने तेथे लॉकडाऊन वाढवण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य पथकाने केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

लॉकडाऊन 3 चे संकेत 
देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या २६ हजार ४९६ वर गेली आहे, तर ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात तब्बल १ हजार ९९० रुग्णांची वाढ झाली आहे, तर ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. तथापि लॉकडाऊन २.० चा कालावधी सुद्धा आठ दिवसांवर आला असतानाही रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा कमालीचा वाढला आहे. त्यामुळे लॉकडाऊन ३.० चे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *