👁 6 Views

भारत-चीन सीमेवर सैन्यसंख्या वाढवली… भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना हायअलर्ट


Pandharpur Live Online-

नवी दिल्ली- लडाखमध्ये भारत-चीन सैन्यादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना पूर्णपणे हायअलर्ट वर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ आर्मी डिफेंस (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सैन्याच्या प्रमुखांची बैठक घेतली. चीनला लागून असलेल्या ३५०० किलोमीटरच्या सीमेवर भारतीय सैन्याची करडी नजर आहे. तिन्ही दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत . चीनला उत्तर देण्यासाठी हिंद महासागरातही नौदलाने तयारी केली आहे.

सैन्याने सर्वप्रथम अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व लडाखच्या लाइन ऑफ एक्च्युअल कंट्रोल (एलएसी) वर आपल्या सर्व प्रमुख फ्रंट-लाईन ठिकान्यांव्यतिरिक्त इतर जवानांना रवाना केले आहे.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
वायुसेनाने प्रथम आपल्या सर्व अग्रभागी रेषेत एलएसी आणि बॉर्डर भागावर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट स्तर वाढवला आहे.

सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैनिकांदरम्यान १५ आणि १६ जूनच्या मध्यरात्री झडप झाली. या झडपमध्ये भारतीय सैन्यात 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे देखील जवळपास ४० सैनिक मारले गेल्याचे बोललं जात आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित असल्याचे सांगत चीनला सुनावलं.

बुधवारी रात्री पंतप्रधान निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. लडाख मधील परिस्थितीवर या दरम्यान चर्चा झाली. तर पंतप्रधान मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षांची बैठक बोलवली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काल (१७ जून) या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक शब्दात चीनला उत्तर दिलं आहे. आम्ही जशाच तसं उत्तर देण्यास सक्षम असून. भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. यथोचित कारवाई केली जाईल असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

15 जूनला चिनी राष्ट्राध्यक्षांना वाढदिवसाची भेट देण्यासाठी चिनी लष्कराची नीच कुरापत

गलवान खोऱ्यात १५ जून रोजी जेव्हा चिनी सैनिक विश्वासघातकीपणे भारतीय सैनिकांना घेरून कौर्य करत होते, तेव्हा चीनमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वाढदिवसाचा समारंभ सुरू होता. पीएलएचे हे कृत्य म्हणजे जिनपिंग यांच्या वाढदिवसाची भेट असल्याचे भारतीय लष्करी सूत्र सांगताहेत. शहिदांच्या शरीरावरील जखमा याचा पुरावा आहेत. २० शहिदांपैकी १६ जणांच्या शरीरावर काठ्या आणि दगडाचे वार यांच्या खोलवर जखमा आहेत. चार जवानांचा मृत्यू शिखरावरून पडल्याने झाला. मात्र त्यांना धक्का दिला की या झटापटीत ते वरून पडले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुमारे १५ हजार फूट उंचीवर हा हिंसाचार जेथे झाला तेथे खूपच कमी जागा आहे. ज्या सीमा चौकीवर आक्षेप नोंदवण्यासाठी कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. संतोष गेले होते. तेथे चिंचोळी वाट खाली जाते. तेथून चिनी सैनिक या चौकीतून तंबू परत नेताना दिसले होते. मात्र, कर्नल संतोष यांची तुकडी पोहोचल्यानंतर पीएलएने पवित्रा बदलला आणि त्यांना घरून मारण्यास सुरुवात केली. सूत्रांनुसार, मंगळ‌वारी हेलिकॉप्टरने चिन्यांनी जखमी सैनिकांना बाहेर काढले. येथून ४६ स्ट्रेचर जाताना दिसले. मात्र, यापैकी किती जखमी आणि किती मृतदेह होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चिनी कुरापतीच्या विरोधात बुधवारी देशभर संताप उसळला. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी चिनी दूतावासासमोर निदर्शने केली. गलवान खोऱ्यात शहीद जवानांना बुधवारी लेहच्या लष्करी रुग्णालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. येथून पार्थिव मूळ गावी नेण्यात आले.

खोटारडेपणा : चिनी परराष्ट्रमंत्री म्हणाले, चकमक चीनच्या हद्दीत

चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी १५ जूनच्या घटनेबद्दल म्हटले आहे की, ‘दोन्ही सैनिकांत जेथे चकमक झाली तो भाग चीनच्या नियंत्रणात आहे. भारतीय लष्कर एलएसी ओलांडून तेथे पोहाचले.’ मात्र, चीनचा खोटारडेपणा १६ जूनच्या सॅटेलाइट इमेजमधून दिसला. १६ जूनला सायंकाळच्या या छायाचित्रात चिनी सैनिक भारतीय हद्दीत दिसत आहेत. म्हणजे घटनेच्या दुसऱ्या दिवशीही घुसखोर तेथेच होते.

भारत-चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची फोनवर चर्चा, पुढे तणाव वाढू नये या मुद्द्यावर एकमत :

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी फोनवर चर्चा केली. हा तणाव वाढवणारी कारवाई करण्याऐवजी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करण्यावर दोघांत एकमत झाले. जयशंकर यांनी या वेळी गलवान खोऱ्यातील घटनेबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, तणाव कमी करण्यासाठी ६ जूनला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत जवान हटवण्यावर एकमत झाले होते. मात्र, चिनी सैनिक भारतीय हद्दीत तंबू उभारण्यासाठी हट्टाला पेटले होते. यावरून वाद झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *