👁 10 Views

वाळु चोरट्यांची मुजोरी वाढली… कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांच्या अंगावर गाडी घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न! पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनात समन्वय गरजेचा!

Add caption

पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूरमध्ये वाळु चोरट्यांची मुजोरी वाढत असुन आज वाळु चोरट्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तहसिलदार डॉ. वैशााली वाघमारे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर चारचाकी वाहन घालून, त्यांना दुखापत करून जिवे मारण्याचा प्रयत्न  प्रयत्न वाळु चोरट्यांनी केला. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यास आरोपींनी शिवीगाळ केली. या प्रकरणी तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनात समन्वय गरजेचा!
 
हल्ली संपुर्ण महाराष्ट्रभरात घडणा-या कित्येक गुन्ह्यांमध्ये अवैध धंद्यांमुळे फोफावलेल्या गुन्हेगारीचा समावेश ठळकपणे जाणवत आहे. त्यातच अवैधरित्या वाळु उपसा करून रातोरात गडगंज संपत्तीचे मालक बनलेले वाळूमाफिया दिवसेंदिवस मुजोर बनत चालल्याचे अनेक घटनांवर नजर टाकल्यास स्पष्ट होते. परंतु वाळुमाफियांची वाढत असलेली ही दादागिरी वाढण्यासाठी यांच्यावर अंकुश न आणता, कठोर कारवाई न करता बघ्याची भुमिका घेणारे पोलीस आणि महसूल प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे.  कारण जर पोलीस आणि महसूल प्रशासनात समन्वय असेल आणि दोन्ही खात्याने मिळुन वाळुच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा सपाटा चालवला तर निश्चितच वाळु चोरट्यांच्या मुजोरीला आणि दहशतीला आळा बसेल. अन्यथा हे असे प्रकार घडलेले आहेत, घडत राहतील, आम्ही बातम्या करू, लोक वाचतील, काही दिवस चर्चाही होतील आणि पुन्हा सर्वकाही जैसे थे! 
     – संपादक पंढरपूर लाईव्ह 
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, की 21 जुलै रोजी भीमा नदीच्या पात्रात सांगोला जॅकवेलजवळ वाळुचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार डॉ. वैशाली वाघमारे यांना मिळाल्यानंतर त्या तातडीने त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोचल्या. यावेळी चंद्रभागा नदीपात्रातून विनापरवाना वाळू उत्खनन करून बिगर क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनामधून वाळू घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. तहसिलदार डॉ. वाघमारे आणि त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी वाळू चोरांना अडवण्याचा प्रयत्न  केला. तेव्हा आरोपी अण्णा पवार, ग्यानबा धोत्रे आणि भैय्या ऊर्फ प्रकाश गंगथडे यांनी शासकीय कामात अडथळा आणून तहसिलदार डॉ. वाघमारे आणि त्यांच्या सोबतच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहने घालून त्यांना दुखापत करण्याचा व जिवाला धोका होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. पथकातील प्रशांत शिंदे यांना ढकलून देऊन दमदाटी केली.
सुमारे तीन लाख रुपये किंमतीच्या दोन पांढऱ्या रंगाच्या बिगर नंबरच्या चारचाकी वाहनांमधून शासनाच्या मालकीची सुमारे 12 हजार रुपये किंमतीची गौण खनिज वाळू चोरून नेली. या प्रकरणी तहसीलदार डॉ. वाघमारे यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आण्णा पवार, ग्यानबा धोत्र व भैय्या उर्फ प्रकाश गंगथडे यांच्याविरुध्द भा.दं.वि.कलम ३०७ ३५३, ३३२, ३७९, ५०६, ३४ पर्यावरण संरक्षण कायदा क. ९ व १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली.
 वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *