पंढरपूर, प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथील भीमा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळुची तस्करी सुरू होती. याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांना समजताच त्यांनी सदर ठिकाणावर अचानक छापा टाकुन वाळु चोरट्यांना जोरदार दणका दिला आहे. करकंब पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारे व्होळे हे गाव अलीकडे वाळू चोरीबाबत सतत चर्चेत आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांशिवाय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात अवैधरित्या वाळुची तस्करी मोठ्या प्रमाणात होते. वाळु तस्कर पंढरपूर तालुक्यातील भीमेच्या पात्राला अक्षरशः ओरबाडून घेत आहेत. हे थांबणं अतिशय गरजेचे आहे. बिनबोभाट सुरू असलेल्या या वाळुच्या धंद्यामुळे अनेकजण गब्बरगंड बनले आहेत. कमी कष्टात मिळणा-या मुबलक पैशामुळे अर्थातच वाळु चोरट्यांची मुजोरी सुध्दा वाढलेली आहे. यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढण्यासही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पंढरपूर च्या महिला तहसिलदार वाळु तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेल्या असता त्यांच्यासहकर्मचा-यांच्या अंगावर गाडी घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न वाळु चोरट्यांनी केला होता. त्यामुळे मुजोर बनलेल्या या वाळु चोरट्यांवर प्रशासनाचा अंकुश असणे अत्यावश्यक बनले होते. आज पंढरपूर चे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलेल्या कारवाईला यामुळेच महत्व प्राप्त झाले आहे. अशी कारवाई सातत्याने व्हायला हवी, एवढेच.– संपादक, पंढरपूर लाईव्ह
वाळू तस्करांनी मांडलेला उच्छाद आता सर्वसामान्यांनाही माहित आहे. तहसिलदार आणि त्यांच्या पथकाच्या अंगावर गाडी घालून त्यांना दुखापत करण्याचाही प्रयत्न झाल्याचा गुन्हा दोन दिवसांपूर्वीच दाखल झाला आहे. त्यापूर्वीही या वाळू तस्करांनी सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत पण आज हेच वाळू तस्कर सरकारी माणसांना पाहून पाय लावून पळाल्याची धम्माल घटना घडली आहे.
भीमा नदीच्या पात्रातून सर्रास वाळूची चोरी होत असते. सरकारी महसूल बुडवत यांच्या बँकेची खाती गलेलठ्ठ होत असतात आणि त्या जोरावर त्यांची दादागिरी सुरु असते. आज मात्र त्यांना पाय लावून पळावे लागले आणि परिसरातील लोक हसत राहिले. करकंब पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारे व्होळे हे गाव अलीकडे वाळू चोरीबाबत सतत चर्चेत आहे. उप विभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिसांशिवाय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भीमा नदीच्या पात्रात छापा टाकला. वाळू उपसा होता असल्याने रस्ता खराब होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती त्यानुसार अचानक आणि स्थानिक तलाठी. मंडळ अधिकारी याना माहिती न देताच हा छापा टाकण्यात आला.
हा छापा टाकण्यात आला तेंव्हा वाळू तस्कर वाळूची चोरी करीत होते. प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी समीर मुजावर, इसबावीचे तलाठी प्रशांत शिंदे, एम. डी. पाटील, राजेंद्र वाघमारे, कैलास दुशिंगे, शिवशरण कटारे यांचे पथक अचानक पोहोचले तेंव्हा या वाळू तस्करांची चांगलीच भंबेरी उडाली आणि वाट मिळेल त्या दिशेने ते पळत सुटले. येथे उभे असलेले दोन टिपरही पळवून नेण्यात आले सुमारे २२५ ब्रास वाळूचा उपसा करून ठेवल्याचे यावेळी दिसून आले. जेसीबी चालक पळून गेला परंतु यावेळी एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आली एकूण १६ रॅम्प वरून वाळू उपसा सुरु असल्याचे दिसून आले. उपसा केलेली वाळू तसेच एक जेसीबी मशीन जप्त करण्याची कारवाई करण्यात आलेली असून रॅम्प करण्यास मान्यता दिलेल्या शेतकऱ्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समजते. पंचनामा करून ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्यात येणार असल्याचे समजते.

