👁 8 Views

गोरगरीबांना परवडेल अशा अल्पदरात उपलब्ध होणार कोरोना लस! पुणे सीरम इन्स्टिट्युटचं पुढचं पाऊल

Pandharpur Live Online

पुणे-  गोरगरीबांना परवडेल अशा अल्पदरात कोरोना लस उपलब्ध होण्यासाठी पुणे सीरम  इन्स्टिट्युटनं पुढच पाऊल उचललं आहे. लवकरात लवकर कोरोना लस तयार व्हावी आणि नागरिकांसाठी ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. मात्र कोरोना लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि स्वस्तदेखील असावी यासाठी भारत प्रयत्नशील. भारतासह जगातील गोरगरीब, कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना अशी परवडणारी लस उपलब्ध करून देण्याचा भारताचा मानस आहे आणि त्या दिशेनं आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया सरसावली आहे.


सीरम इन्स्टिट्युटने GAVI या आंतरराष्ट्रीय लस संस्थेशी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनशी भागीदारी केली आहे. जवळपास 100 दशलक्ष डोस पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही संस्था मिळून भारतासह इतर गरीब देशांसाठी 2021 पर्यंत 100 दशलक्ष कोरोना लशीचं उत्पादन करतील. या लशीची किंमत जास्तीत जास्त 3 यूएस डॉलर म्हणजे फक्त 225 रुपये असेल. यासाठी गेट्स फाऊंडेशन 150 मिलियन डॉलर्सचा निधी देणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषधं निर्माण करणारी कंपनी आहे. औषध निर्माण करणारी जगातली सर्वोत्तम संस्था म्हणून ओळखली जाते. जगभरात सध्या जवळपास 140 कोरोना लशींवर काम सुरू आहे. यापैकी काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सीरम इन्स्टिट्युटनेही ऑक्सफर्ड AstaZeneca आणि अमेरिकेच्या Novavax  या कंपनीसह लशीबाबत करार केला आहे.

कोरोनाव्हायरसवरील लस येईपर्यंत पुढचं एक वर्ष मास्क हा तुमच्या पेहरावाचा आणि सौंदर्याचा भाग बनवून घ्या. कोरोना विषाणूसोबतचा लढा वैयक्तिक स्तरावर लढण्यासाठी एक ते दीड मीटर अंतर ठेवा आणि नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने धुवून घेतल्याचं सुनिश्चित करा. शिवाय ज्यांना रक्तदाब सारखे आजार आहेत त्यांनी जास्त घराबाहेर पडू नये, असा सल्ला पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. राजीव ढेरे यांनी याआधी सांगितलं होतं

तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आणि एपिडेमोलॉजिस्ट सुनेत्रा गुप्ता यांनी कोरोनाची लस येईल मात्र कदाचित या लशीची गरजही पडणार नाही, असा दावा केला होता. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा गुप्ता म्हणाल्या, सामान्यत: निरोगी लोक, जे वृद्ध नाहीत, कमजोर नाहीत आणि त्यांना इतर कोणता आजार नाही अशा लोकांना कोरोनाव्हायरसला घाबरण्याची काहीच गरज नाही, हा फ्लूप्रमाणेच असेल. इन्फ्लूएंझापेक्षादेखील या व्हायरसमुळे कमी लोकांचा मृत्यू होईल अशी मला आशा आहे

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *