पंढरपूर / प्रतिनिधी : –विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी एस.एम तांदळे यांनी कारखाना स्थळावर संचालक मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते.

यावेळी सर्व संचालक मंडळाने भगीरथ भालके यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केला. चेअरमन पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत केवळ भगीरथ भालके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तांदळे यांनी जाहीर केले.
या निवडीनंतर विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक युवराज पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, समाधान काळे, गणेश पाटील, मोहन कोळेकर, सुर्यकांत बागल, विजयसिंह देशमुख, व्यंकट भालके आदींसह सर्व संचालक मंडळ कार्यकर्ते उपस्थित होते.
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना पंढरपूर तालुक्याच्या राजकारण, अर्थकारणाचा महत्त्वाचा घटक राहिलेला आहे. या कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारत, सभासदांना चांगला दर मिळावा यासाठी स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केले होते.
अलीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी वडीलकीच्या नात्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास आपले सहकार्य राहणार असल्याचे म्हटले होते. या कारखान्याची घडी चांगल्या पद्धतीने बसावी यासाठी आता सर्वांना प्रयत्न करावा लागणार आहे. पुढच्या तीन चार महिन्यात या कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येऊ घातली आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोट निवडणूकीच्या दृष्टीने सर्वांना सोबत घेऊन पुढील राजकारण विठ्ठल परिवाराला करावे लागणार आहे.
Advet.
……………