👁 13 Views

पुणे-सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात… एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी!

Pandharpur Live Online: यवत (ता. दौंड) येथे पुणे- सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 मिनीबस, कंटेनर व व्हॅगनार कार यांचा हा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात यवतच्या पुर्वेकडे असलेल्या हॉटेल अन्नपूर्णा समोर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला आहे.


सोलापूर कडून येत असलेल्या मिनीबस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. महामार्गाचा डिव्हाडर ओलांडून मिनीबस विरूद्ध दिशेच्या रस्त्यावर गेली. त्याच वेळी पुण्याच्या दिशेने सोलापूर कडे जात असलेल्या कंटेनरची त्याला जोरदार धडक बसली.

यात मिनीबस जागेवरच पलटी झाली. मिनीबसमध्ये केवळ दोनच व्यक्ती असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या गडबडीत कंटेनर चालकाचेही आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर विरूद्ध बाजूच्या मार्गावर गेला. कंटेनरमधील लोखंडी पट्ट्यांचा महामार्गाच्या दोन्ही रस्त्यावर सडा पडला होता. याच वेळी सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे वेगाने जात असलेली व्हॅगनर कार कंटेनरला धडकता-धडकता वाचली. कारमधील चारही प्रवाशी सुखरूप होते.

दरम्यान, या अपघातात महामार्गाच्या दोन्ही रस्त्यावर मोठे अडथळे निर्माण झाले. वाहतुक विभागाचे पोलीस व यवत पोलिसांनी वेळीच निर्णय घेत सेवा रस्त्यांवरून वाहतूक वळवल्याने पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीस फारसा अडथळा झाला नाही. मात्र, सोलापूर बाजूकडे जाणाऱी वाहतूक काही काळ खोळंबली. यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *