👁 9 Views

ठाकरे कुटुंबीयांवर टीका केल्यामुळेच नारायण राणे यांना मिळत आहेत पदे व भाजपमधील वरिष्ठांच्या गाठीभेटी!- डॉ. नीलम गोऱ्हे


 

Pandharpur Live Online: ठाकरे कुटुंबीयांवर टीका केल्यामुळेच नारायण राणे यांना पदे व भाजपमधील वरिष्ठांच्या गाठीभेटी मिळत आहेत. त्यामुळे ठाकरे कुटुंबीयांवरील टीका हिच नारायण राणे यांची रोजी रोटी आहे! अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. तसेच नारायण राणे यांनी केवळ महिनाभर राणे यांनी ठाकरे कुटुंबियांवर टीका न करता गप्प बसून दाखवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सोमवारी (दि. 23) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नारायण राणे यांच्या वक्‍तव्याचा खरपूस समाचार घेतला.

डॉ. गोऱ्हे यांना शिवसेनेत आणल्याचा दावा नारायण राणे यांनी केल्याचे विचारले असता त्या म्हणाल्या की, एका उद्योगपतींनी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीनंतर माझा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांची मदत झाली असेलही, मात्र शिवसेना प्रवेशाबाबत केलेले राणे यांचे वक्‍तव्य धांदात खोटे असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच माझ्या शिवसेना प्रवेशासाठी सत्यशोधक समितीची स्थापना करावी लागेल, असेही त्यावेळी म्हणाल्या.

भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर याठिकाणाची शिवसैनिकांकडून गोमूत्र शिंपडल्याने सेनेची वाटचाल अंधश्रद्धेकडे चालली आहे का? असे विचारताच त्या म्हणाल्या की, प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. बाळासाहेब ठाकरे यांनी रंगशारदामध्ये शेलक्‍या भाषेत टीका करुन राणेंची हकालपट्टी केली होती. काही शिवसैनिकांना खोटेपणाची चीड असल्यानेच काही शिवसैनिकांनी याठिकाणी गोमूत्र शिंपडले. मात्र गोमूत्र शिंपडण्याबाबत वरिष्ठ स्तरावरुन आदेश दिलेले नव्हते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर जुहू येथील अनधिकृत बंगला पाडण्याबाबतची भूमिका देखील नारायण राणे यांनी स्पष्ट करावी, असेही त्या म्हणाल्या.

तसेच किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांपैकी एक तृतीयांश आरोपांबाबत ते नंतर बोलत नाहीत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपांची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जातीवाद वाढल्याच्या राज ठाकरे यांच्या वक्‍तव्यावर त्यांनी बोलणे टाळले. शिवसेना जात-पात मानत नसल्याने त्यावर बोलण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे त्या म्हणाल्या. तर राजकीय व्यक्‍तींच्या वक्‍तव्य फारसे गांभिर्याने घ्यायचे नसते असे सांगत, पुन्हा येणार अशी घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस कोठे आहेत? याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *