राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने लाखो हेक्टर जमीनीतील पिकांना फटका बसला. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव येथील शेतकरी आपली दिवाळी चक्क स्मशानभुमीत साजरी करत आहेत. सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे लक्ष दिलेली नाही, पंचनामे सुरू झाले नाहीत, नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे आणि फटाके नाही.
त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ दिवाळी स्मशानभूमीतच साजरी करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली.
पंचनामे कधी करणार, तोपर्यंत शेतकऱ्यांचे हाल होऊन जातात. पंचनामे होईल, तेव्हा होईल. पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबादेत पोहोचले. दहेगाव आणि गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी पाहणी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.




