वाग्दत्त वराने म्हणजे होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्याने एका तरुणीने त्याच्याच कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
न्यायालयाच्या गेटवरच तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
ब्रम्हपुरी येथील दिवाणी न्यायालयाच्या निर्माणाधिन इमारतीच्या गेटवर आज सकाळी एका तरुणीने गळफास घेतलेले आढळून आले. मंगळवारी पहाटे पौर्णिमा मिलिंद लाडे या 27 वर्षीय मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. ही तरुणी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात असलेल्या कोरेगाव (चोप) येथील रहिवाशी असून, सचिन शेंडे या ब्रम्हपुरीत राहणाऱ्या तरुणासोबत दीड वर्ष आधीच तिचा साखरपुडा झाला होता. सचिन हा ब्रम्हपुरी च्या दिवाणी न्यायालयात चपराशी पदावर कार्यरत आहे.
साखरपुडा झाल्यानंतरही होणारा नवरा लग्नास टाळाटाळ करत असल्याने मुलीने टोकाचे पाऊल उचलले आणि त्याच्याच कार्यालयाच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारी वरून सचिन शेंडे वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.



