वाहतूक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने दुचाकीवरून आलेल्या तिघांनी एका व्यक्तीच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्यांनाच, ‘तुम्ही अपघात केलाय.
40 हजार रुपये दे, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही,’ असे धमकावत संबंधित व्यक्तीला मारहाण करून जबरदस्तीने 20 हजार रुपये ऑनलाइन आपल्या खात्यात वर्ग करून घेतले.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दुचाकीवरील तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध खंडणी, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात रात्री साडेबाराच्या सुमारास साधू वासवानी चौक परिसरात घडली. याबाबत हिंगणेमळा हडपसर येथील एका 56 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शहरातील एका खासगी कंपनीत काम करतात. रात्रीच्या वेळी ते दुचाकीवरून आपल्या घरी निघाले होते. त्या वेळी साधू वासवानी चौकात विरुद्ध दिशेने आलेल्या तिघांनी फिर्यादींच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर त्यांना धमकी दिली. फिर्यादीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाबरून फिर्यादींनी 20 हजार रुपये देण्याचे कबूल केले.
त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मोबाईलमधील क्यूआर कोड स्कॅन करून 20 हजार रुपये आपल्या बँक खात्यात जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. झालेल्या प्रकारामुळे फिर्यादी घाबरले होते. त्यामुळे त्यांनी उशिरा तक्रार दिली. दरम्यान, दत्तवाडी पोलिसांनी अशाप्रकारे नागरिकांना अपघात झाल्याचा बहाणा करून लुटणार्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. त्यांनी 40 पेक्षा अधिक नागरिकांना अशाप्रकारे लुटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.



