👁 8 Views

देवदर्शन, पर्यटनासाठी टूर पॅकेजच्या बहाण्याने 4.50 लाखांची फसवणूक

 

देवदर्शनासह जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी 14 दिवसांचे टूर पॅकेज देण्याच्या बहाण्याने टिंबर मार्केट येथील व्यापार्‍याची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीला आला.


याप्रकरणी इस्लामपूर येथील अमित अशोक कांबळे याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

व्यापारी दिलीप पटेल (रा. टिंबर मार्केट) यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दिली आहे. दि. 3 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर 2022 या काळात हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.


दिलीप पटेल यांच्यासह मित्रांनी वैष्णोदेवीचे दर्शन व पर्यटनाचा बेत केला. इस्लामपूर येथील एजल टूर्स कंपनीचा कर्मचारी अमित कांबळे याने टिंबर मार्केटमध्ये येऊन पटेल यांची प्रत्यक्षात भेट घेतली. वैष्णोदेवीच्या दर्शनासह जम्मू-काश्मीर पर्यटनासाठी 14 दिवसांचे पॅकेज देऊ केले. त्यासाठी संबंधितांनी 4 लाख 50 हजार रुपयांची रक्कम बँक खात्यावर ऑनलाईन जमा केली.


विमानाचे तिकीट आणि हॉटेल्सचे ऑनलाईन बुकिंग केल्याच्या पावत्या कांबळे याने पटेल यांना पाठविल्या. चौकशीअंती तिकीट व हॉटेल्सच्या पावत्या खोट्या असल्याचे निदर्शनास आले. पटेल यांच्यासह त्यांच्या मित्रांनी कांबळे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापार्‍याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *