मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असून लिपिक पदावर नोकरी लावून देतो अशी बतावणी करत बेरोजगार तरुणांची 74 लाखांची फसवणूक करणाऱया चार जणांच्या टोळीच्या मुंबई गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
आरोपींमध्ये एका मंत्रालयीन शिपायाचा समावेश आहे.
मंत्रालयात सचिव पदावर कामावर असल्याने त्या ओळखीवर तुमच्या नोकरीचे सहज काम करून देऊ, असे मंत्रालयात शिपाई पदावर कामावर असलेल्या सचिन डोळस व त्याचे अन्य तिघे साथीदार बेरोजगार तरुणांना सांगायचे.
त्यांच्या भुलथापांना बळी पडून दहा ते बारा तरुणांनी मंत्रालयातली नोकरी पाहिजे असल्याचे सांगत त्या भामटय़ांना लाखो रुपये दिले. मात्र पैसे देऊनही नोकरीचे काम होत नसल्याचे लक्षात येताच त्या बेरोजगारांनी पोलिसांत धाव घेतली.
त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास करून तरुणांची पैसे घेऊन फसवणूक करणारा सचिन डोळस याच्यासह त्याचे साथीदार महादेव शिरवाळे, नितीन साठे आणि महेंद्र सकपाळ अशा चौघांना अटक केली.



