Pandharpur Live News: कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी साहित्याचे थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो.
या दिनानिमित्त प्रशालेतील मराठी विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटक, समूहगीत व समूह नृत्य अशा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमांतून मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यपरंपरा व सांस्कृतिक वारसा यांचे प्रभावी दर्शन घडले.
कार्यक्रमप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही आपली अस्मिता असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात तिचा अभिमान बाळगावा असे सांगितले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या परिश्रमामुळे मराठी राजभाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.
Posted inEducation
“कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा”

