सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रविवारी रात्री आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. रवींद्र काजळे असे मृत तरुणाचे नाव आहे.
मयत तरुणाचा चुलत भाऊ दीपक काजळे याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी रवींद्र, त्याचा मोठा भाऊ आणि अन्य एका मित्राने गावाजवळील एका शेतात पार्टी करण्याचं नियोजन केले होते. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता रवींद्र आपल्या दुचाकीवरून पार्टीसाठी ठरलेल्या शेताकडे जाण्यासाठी निघाला. तर त्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ व त्याचा मित्र देखील शेतात जाणार होते.
रवींद्र शेताकडे गेल्याने त्याचा भाऊ आणि मित्र सुद्धा शेताकडे निघाले असतानाच, गावाजवळील माणकाई रस्त्यावरील खड्ड्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्या दोघांनी तिकडे धाव घेतली.
दोघांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो रवींद्र काजळेचा असल्याची ओळख पटली. रवींद्रच्या मानेवर हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. बिबट्याने रवींद्रवर हल्ला करून त्याला ओढून रस्त्याच्या कडेला सोडले असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील पोलिसांनी गावकऱ्यांना केलं आहे. तसेच याप्रकरणी सिल्लोड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.



