Pandharpur: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासून भव्य विज्ञान प्रदर्शन संपन्न केले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीप्रसाद मोहिते सरांनी केले.
या प्रदर्शनामध्ये नर्सरी, जुनियर केजी व सीनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी औषधी वनस्पती हा विषय घेऊन प्रदर्शनात विविध वनस्पतींची माहिती सादर केली. तसेच इ.१ली ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी अनेक वैज्ञानिक उपक्रम सादर केले.
यामध्ये पारंपरिक ऊर्जा, सौर ऊर्जा, जलस्त्रोत, सौरमंडळ, चंद्रयान ३,मंगल रोवर तसेच पारंपरिक शेती, नैसर्गिक शेती, आधुनिक शेती, सामूहिक शेती आधुनिक शहर निर्मिती, गोबर गॅस, कचऱ्यांची विल्हेवाट, संगणक कोडींग माध्यमातून नवीन तंत्रज्ञान वापरून अपघात रोधक कारची निर्मिती, अशा अनेक वस्तूंचे सादरीकरण करून प्रमुख पाहुणे तसेच सर्व पालकांची मने जिंकली. या भव्य प्रदर्शनाची संकल्पना व प्रेरणा प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांची होती. जवळपास एक महिना हे विद्यार्थी या प्रदर्शनासाठी स्वतः उपक्रम तयार करत होते.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील विज्ञान शिक्षक श्री सुधीर गोडसे सर, अन्सार पटेल सर व अनिता बडवे आणि मोनिका अटकले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उद्घाटना वेळी इ. ५वी च्या विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित लावणी सादर केली. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रशालेच्या प्रांगणात विज्ञानातील विविध घटकांची रांगोळी साकारण्याचे काम महिला शिक्षकांनी केले. विज्ञानाला सर्व विषयांची जोड असते याचे उदाहरण म्हणजे चित्रकला व हस्तकला शिक्षिकांनी सेल्फी पॉईंट तयार करून जे सेल्फी फोटो घेणार आहेत यांना अंतराळ सफर घडवण्याचा प्रयत्न केला.
या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री. प्रणवजी परिचारक, संस्थेचे रजिस्ट्रार श्री वाळके सर, डॉ.सोनवणे, डॉ. श्रीराज काणे हे उपस्थित होते. या सर्वांनी या विज्ञान प्रदर्शनाचे भरभरून कौतुक केले. हे प्रदर्शन पालक व विद्यार्थ्यांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले होते. हे विज्ञान प्रदर्शन भव्य प्रमाणात सादर करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या विज्ञान प्रदर्शनासाठी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री रोहनजी परिचारक यांनीदेखील शुभेच्छा दिल्या.