बार्शी-लातूर बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात एका तरुण फोटोग्राफरच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तरुणाच्या डोक्यास व पायास गंभीर दुखापत झाली
घटना गुरुवारी घडली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. प्रदीप हरिबा ठोंगे (वय ३१, उपळाई ठोंगे बार्शी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत सुदाम बलभीम ठोंगे (वय ४२, रा.उपळाई ठोंगे, ता. बार्शी) यांनी फिर्याद दिली. अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा चुलत भाऊ प्रदीप ठोंगे हा फोटोग्राफीचे काम करून एम. एच.१३/डी. झेड ३६१४ या गाडीवरून बार्शी येथून उपळाई ठोंगे येथे येत होता. बार्शी बायपास रोडवर उपळाई ठोंगे चौकात प्रदीप यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली.
दरम्यान, या अपघातात दुचाकीवरील प्रदीप यास गंभीर दुखापत झाली. जखमीस पोलिस कॉन्स्टेबल राहुल बोंदर यांच्यासह काही गावातील मंडळींनी उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.