सांगोला: दुचाकी आणि बैलगाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका बैलासह दुचाकीवरील दोघेजण ठार झाल्याची घटना सांगोला येथील हॉटेल श्रीराम हॉटेलजवळ शनिवारी (ता. २२) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे.
अभिजित दादा भोसले व नंदकुमार चंद्रकांत चौधरी (दोघेही रा. पापरी, ता. मोहोळ) हे जागीच ठार झाले आहेत. बैलगाडी चालक जखमी झाला आहे.
धायटी (ता. सांगोला) येथील शेतकरी बैलगाडी घेऊन रविवारी असणाऱ्या सांगोला येथील आठवडा बाजारात बैल विक्री करण्यासाठी निघाले होते. दरम्यान, त्यांची बैलगाडी रत्नागिरी- सोलापूर हा महामार्ग ओलांडून सांगोल्याच्या दिशेने जात असताना सोलापूरच्या दिशेने चाललेली एमएच १३ – ईजी ५३६५ या क्रमांकाची दुचाकी बैलगाडीवर आदळली.
हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये गाडीचा एक बैल आणि दुचाकीवर असणारे अभिजित दादा भोसले (वय २८) व नंदकुमार चंद्रकांत चौधरी (वय २७, दोघेही रा. पापरी, ता. मोहोळ) हे दोघे जागीच ठार झाले. तर बैलगाडी चालक जखमी झाला आहे. अपघाताची माहिती समजताच सांगोला पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमी आणि मृतांना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.